Makhana Modak Marathi Recipe: देशभरात गणेश चतुर्थीची धामधूम सुरु आहे. आज घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. आता घरात महिला बाप्पाच्या प्रसादाची जोरदार तयारी करत आहेत. बाप्पाला मोदक सर्वात प्रिय आहेत. त्यामुळे दरवर्षी नैवेद्यात-प्रसादात मोदक आवर्जून असतात.
आपल्याकडे तळणीचे आणि उकडीचे मोदक विशेष प्रसिद्ध आहेत. या पारंपरिक पद्धतींशिवाय अलीकडे लोक विविध प्रकारचे मोदक बनवतात. त्यामध्येच एक म्हणजे पौष्टिक असे मखान्याचे मोदक होय. मखाना आरोग्यासाठी उत्तम असतो आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच मखान्याचे मोदक पौष्टिक तर असतातच शिवाय चवीलाही उत्तम असतात. यंदा गणेश चतुर्थीला तुम्हीसुद्धा मखान्याचे मोदक बनवून पाहू शकता. चला पाहूया सोपी रेसिपी….
मखाण्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
मखाणे- ३० ग्रॅम
सुकं खोबरं- १/४ कप
खजूर- १० ते १२
तूप- २ ते ३ टेबलस्पून
खसखस- २ टेबलस्पून
बदाम- १/४ कप
विविध प्रकारचे सीड्स- भोपळ्याचे, सूर्यफुलाच्या बिया
पांढरे तीळ- १ टेबलस्पून
कोको पावडर- १ टेबलस्पून
मखाण्याचे मोदक बनवण्याची रेसिपी-
मखाण्याचे मोदक बनवताना सर्वप्रथम एका कढईत सुके खोबरे, तीळ, खसखस, सर्व प्रकाराच्या बिया हे सगळे पदार्थ एकत्र करून हलकेसे भाजून घ्यावे. नंतर तयार सारण थोडे थंड होण्यासाठी ठेवावे.
आता मखाणे घेऊन एका कढईत हलकेसे भाजून घ्यावे. मखाणेसुद्धा थंड करायला ठेवावे.
नंतर तयार सारण आणि मखाणे एकत्र करून मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यावे.
आता खजुराच्या बिया काढून ते कोको पावडरसोबत कढईमध्ये भाजून घ्यावे. हे मिश्रण तयार मिश्रणात घालून मिक्स करून घ्यावे.
आता मोदकाचे तयार मिश्रण घेऊन एका मोदकाच्या साच्यात भरून हलक्या हाताने सर्व मोदक तयार करून घ्यावेत.
अशाप्रकारे गूळ किंवा साखर न वापरता पौष्टिक खजूर आणि मखण्यापासून बनवलेले मोदक तयार आहेत.





