मुंबई- गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते गौरी आगमनाचे. महाराष्ट्राच्या परंपरेत गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे. अत्यंत भक्तीभावाने माहेरवाशिणी म्हणून गौरीपूजन करण्याची परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी निरनिराळ्या स्वरुपांत ही पूजा बांधली जाते. गौरी माता म्हणजे माता पार्वतीचं रुप असल्याची श्रद्धा आहे. गौरींच्या पूजनानं घरात शांती, समाधान, धनं आणि समृद्धी येते अशी धारणा असल्यानं शतकानुशतके ही परंपरा महाराष्ट्रात साजरी केली जाते.
यंदा जेष्ठा गौरींचं आवाहन कधी?
गणरायाच्या आगमनानंतर साधरण दोन ते तीन दिवसांनी घरोघरी गौरीमातेचं पूजन केलं जातं. यावेळी रविवारी 31 ऑगस्ट रोजी गौरींचं आवाहन करुन त्यांना घराघरात आणण्यात येईल. प्रत्येक विभागानुसार आणि कुळाचारानुसार गौरींचं पूजन करण्याची परंपराही वेगवेगळी आहे. कुठे दोन महालक्ष्म्या, कुठे खड्यांची गौरी, कुठे केवळ गौराई अशा रुपांत हे पूजन करण्यात येतं.

या दिवशी गौरीची मूर्ती किंवा प्रतिक घरात आणून तिची पूजा बांधण्यात येते. पहिल्या दिवशी गौराई प्रवासातून येते म्हणून तिच्या विश्रांतीचा दिवस असतो. दुसऱ्या दिवशी गौरींचं पूजन केलं जातं. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पंचपक्क्वानांनी तिला नैवेद्य दिला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन करण्याची परंपरा आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात रविवारी 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.25 वाजेपर्यंत गौरी आवाहनाचा मुहूर्त आहे.
गौरी आवाहनावेळी काय करतात?
गौरीचा मुकूट, मुखवटे सकाळपासून एका ताम्हणात काढून ठेवले जातात. तिच्या घरात आगमनापूर्वी घराबाहेर रांगोळी आणि लक्ष्मीची पावले काढण्याची प्रथा आहे. घरातील कर्त्या पुरुषाने आणि स्त्रीन ताम्हणात मुखवटे घेऊन नातेवाईकांसह घरात प्रवेश करायचा असतो. यावेळी गौरींना संपूर्ण घर, तुळस दाखवण्याची परंपरा आहे. त्यानंतर गणरायाच्या समोर किंवा बाजूस गौरींची स्थापना करण्यात येते.
अनेक घरांमध्ये गणेशोत्सव आणि गौरीपूजेचा कुळाचार पाळण्यात येतोय. या निमित्तानं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. कौटुंबिक ऐक्यासाठी आणि समृद्धीसाठी गौरी पूजनाची परंपरा आजही साजरी केली जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











