श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण लक्षात येताच सर्वात आधी कोणती गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे उंचच उंच दहीहंडी. गुजरात आणि महाराष्ट्रात मोठ्या संख्येने दहीहंडीचा सण साजरा केला जतो. हा उत्सव श्रीकृष्णाच्या लीलेशी संबंधित आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी येणारा हा पवित्र सण यंदा १६ ऑगस्ट २०२५, शनिवारी साजरा केला जाणार आहे. दही हंडी उत्सवाची ही परंपरा कधी आणि कशी सुरू झाली, याचं धार्मिक महत्त्व काय आहे, सविस्तर जाणून घेऊया.
दहीहंडीचा उत्सव का साजरा केला जातो?
हिंदू मान्यतेनुसार, द्वापारयुगात भगवान कृष्ण आणि त्याचे सखे-सोबती नेहमी लोकांच्या घरातून लोणी चोरायचे. ज्यामुळे वैतागलेली आई यशोदा आणि सर्वच घरातील लोक आपल्या घरातील दह्याचं भांडं उंचावर लटकवून ठेऊ लागले. मात्र श्रीकृष्ण आणि त्याच्या सख्या सोबत्यांना दही तर हवंय, मग अशावेळी त्यांनी कल्पना लढवली. त्यांनी मानवी पिरॅमिड तयार करीत लोणीपर्यंत पोहोचू लागले. यादरम्यान अनेकदा लोण्याचं मातीचं भांडं खाली पडून तुटूनही जायचं. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा दहीहंडीच्या रुपात सुरू आहे.
दहीहंडी कशी साजरी करतात?
श्रीकृष्णाचे भक्त ज्या दहीहंडी उत्सवाची वर्षभरापासून वाट पाहत असतात, त्याची तयारी कित्येक महिन्यापासून सुरू असते. या दिवशी एका मोठ्या मातीच्या मडक्यात दूध, दही, लोणी, फळं, मध आदी एकत्र करून उंचीवर लटकवलं जातं. ही हंडी फोडण्यासाठी प्रशिक्षित तरुणाची टोळी एकमेकाच्या खांद्यावर चढून शेवटी हंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. हंडी फोडणाऱ्या मंडळीला विशेष पुरस्कार दिला जातो.
दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवातून एक शिकवण मिळत असते. ध्येय कितीही दूर असले तरी, एकत्र काम केल्यास ते निश्चितच साध्य होऊ शकते. दहीहंडी उत्सव हा एकत्रितपणे काम करण्याच्या भावनेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. याशिवाय सुख-सुविधेशीसंबंधित गोष्टी एकत्र जमा करण्यासाठी नाही तर त्याचा आनंद घेण्यासाठी असतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)





