ईद-उल-अजहा किंवा बकरी ईद हा मुस्लिम समुदायातील लोकांसाठी खूप मोठा सण आहे. बकरी ईद हा केवळ सण नसून तर मित्र आणि कुटुंबियांसोबत उत्तम मेजवानीचा प्रसंग असतो. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात, बकरी ईदच्या मेजवानीमध्ये कोरमा, बिर्याणी यासोबतच गोड पदार्थांनाही विशेष महत्त्व दिले जाते. मेजवानीत काहीतरी खास गोड पदार्थ असावे असे वाटत असेल तर तुम्ही ‘हे’ सोपे आणि स्वादिष्ट गोड पदार्थ बनवून पाहुण्यांची मने जिंकू शकता.
शीर खुरमा
बकरी ईदचा सण शीर खुरमाशिवाय अपूर्ण आहे. दूध, शेवया आणि विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा वापर करुन हा पदार्थ तयार केला जातो. त्यात केशर, वेलची पावडरचाही वापर होतो. सर्वप्रथम, तुपात शेवया सोनेरी रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्या. नंतर, एका भांड्यात दूध घेऊन उकळवा. दुधात भाजलेल्या शेवया, खजूर, बदाम आणि पिस्ता घाला. आवश्यकतेनुसार साखर घाला आणि मिक्स करा. वेलची पूड घालून मिक्स करा. शेवया मऊ होईपर्यंत शिजू द्या. गरमागरम शीर खुरमा सर्व्ह करा.

फिरनी
फिरनीसुद्धा खिरीसारखचा प्रकार आहे. दूध, साखर आणि तांदळाचा वापर यात केला जातो. सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवा. यासाठी भिजवलेले तांदूळ वाटून जाडसर पेस्ट बनवा. एका भांड्यात तूप गरम करा. त्यात तांदळाची पेस्ट, दूध, साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा. मध्यम आचेवर 20-25 मिनिटे शिजवा, तोपर्यंत तांदूळ मऊ आणि दूध घट्ट होईपर्यंत. नंतर बदामाचे आणि पिस्त्याचे तुकडे घालून मिक्स करा. गरम गरम फिरनी सर्व्ह करा.
शाही तुकडा
बकरी ईदसाठी काहीतरी गोड पदार्थ बनवायचा असेल तर शाही तुकडा बनवा. हा पदार्थ बनवण्यासाठी ब्रेड, दूध, साखर, आणि ड्रायफ्रुट्स वापरले जातात. शाही तुकडा बनवण्यासाठी ब्रेडला तूपामध्ये किंवा तेलामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवून, दुधात भिजवून घ्या आणि ड्रायफ्रुट्सने सजवा.
गुलकंद शेवयांची खीर
प्रथम एक पॅन घ्या. या पॅनमध्ये तूप गरम करून काजू भाजून घ्या. नंतर त्याच पातेल्यात उरलेल्या तुपात शेवया टाकून भाजून घ्या. आता त्यात दूध, गुलकंद, अर्धे काजू, बेदाणे आणि केशर घालून एक उकळी येऊ द्या. त्यात साखर घालून थोडा वेळ मंद आचेवर शिजू द्या. नंतर त्यात रोझ इसेन्स टाका, मिक्स करा आणि गॅस बंद करा. आता काजूने सजवा. थंड किंवा गरम सर्व्ह करा.











