“विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल!”…..हरिनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात. दरवर्षी देहू येथून तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते. वारीमध्ये भजन, कीर्तन, अभंग आणि विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करतात.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
आळंदीतून गुरुवारी (19 जून) रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. गुरुवारी सकाळपासून सर्व दिंड्या आणि वारकऱ्यांची माउलींच्या दर्शनासाठीची लगबग सुरू होती. यंदाचा सोहळा दर वर्षीप्रमाणेच मोठ्या वैभवात आणि उत्साहात साजरा होत आहे. आळंदीतील गांधी वाड्यातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवसांसाठी मुक्कामी असेल. पालखीसमवेत जाण्यासाठी वारकरी दाखल झाल्याने अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजून निघाली आहे. फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरी प्रस्थानापूर्वीचा मनसोक्त आनंद लुटत होते.
संत तुकाराम महाराज पालखी
टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम” असा हरिनामाचा जयघोष करत श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, काल पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाला. निगडी येथील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचलेला दिसून आला. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्कामी असेल.
पंढरपूर वारी
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्या रथातून मार्गस्थ झाल्या आहेत. यासोबतच संत गजानन महाराजांची पालखीही शेगावहून पंढरपूरकडे निघाली आहे. या पालख्यांमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत, टाळ, मृदुंगाच्या गजरात हा सोहळा पंढरपूरकडे जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अन् संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम; हडपसरमधून दोन मार्गाने जाऊन थेट वाखरी गावात एकत्र येणार. आषाढी एकादशी 6 जुलै 2025 पंढरपूरमध्ये या पालख्यांचा समारोप होतो. आषाढी एकादशीला पंढरपूरला होणारी वारी महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि मोठा धार्मिक उत्सव आहे, ज्यात लाखो वारकरी सहभागी होतात.





