नागपंचमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 29 जुलै 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. नागपंचमीला काय खावं? नागदेवतेला प्रसन्न करणारे कोणते प्रसाद आणि पदार्थ आहेत? जाणून घ्या..
नागपंचमीला महाराष्ट्रात कोणते खास पदार्थ केले जातात?
श्रावणातील पहिला सण नागपंचमी हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी कापणी न करणे, भाजणे किंवा कढई न वापरणे अशी परंपरा लोक पाळतात. नागपंचमीला महाराष्ट्रात बनवले जाणारे खास पदार्थ जाणून घेऊयात…
उकडीचे मोदक
- एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात नारळ आणि गूळ घालून चांगले मिक्स करा.
- गूळ वितळला की वेलची आणि जायफळ पूड घालून मिश्रण एकजीव करा.
- मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्या.
- एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ टाका.
- पाणी उकळल्यावर तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा.
- पीठ थोडे थंड झाल्यावर हाताने मळून घ्या.
- मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार द्या.
- वाटीत सारण भरून मोदकाचा आकार द्या.
- मोदक चाळणीत ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या.
पुरणाचे दिंड
नागपंचमीला महाराष्ट्रात पुरणाचे दिंड हा खास पदार्थ करतात. नागपंचमीला सुरी, तवा वापरणे टाळले जाते, त्यामुळे उकडीचे पदार्थ बनवतात. पुरणपोळी ऐवजी दिंड बनवतात, कारण त्यात चिरणे किंवा भाजणे नसते.
- चना डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या.
- गूळ वितळवून घ्या.
- शिजवलेली डाळ, वितळलेला गूळ, वेलची पूड, जायफळ पूड आणि मीठ घालून चांगले मिक्स करा आणि पुरण तयार करा.
- गव्हाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्या.
- पिठाचा गोळा थोडा मऊसर ठेवा.
- पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी (पुरी) लाटून घ्या.
- पारीमध्ये पुरण भरून दिंडाचा आकार द्या.
- सगळे दिंड तयार झाल्यावर चाळणीत ठेवून १८-२० मिनिटे वाफवून घ्या.
उकडीचे कानोळे
- गव्हाचे पीठ, गूळ आणि थोडे तेल घेऊन ते व्यवस्थित मळून घ्या.
- मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून त्रिकोणी आकारात कानोळे तयार करा.
- कुकरमध्ये पाणी गरम करून त्यात कानोळे वाफवून घ्या.
पातोळ्या
नागपंचमीला महाराष्ट्रात पातोळ्या हा खास पदार्थ करतात. विशेषतः कोकण भागात हळदीच्या पानांमध्ये बनवलेल्या पातोळ्या नागपंचमीला नैवेद्य म्हणून दाखवतात.
- तांदळाच्या पिठात थोडे मीठ आणि गरम पाणी घालून पीठ मळून घ्या.
- नारळ आणि गूळ मिक्स करून त्यात वेलची पूड घाला.
- हळदीच्या पानावर पातळसर पिठाचा थर लावा आणि त्यावर नारळाचे मिश्रण पसरवा.
- पान दुमडून त्याची घडी करा.
- कढईत पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवा आणि पातोळ्या वाफवून घ्या.
- गरमागरम पातोळ्यांचा नैवेद्य दाखवा.
गव्हाची खीर
नागपंचमीला महाराष्ट्रात गव्हाची खीर आणि पुरणाचे दिंड हे खास पदार्थ बनवले जातात. गव्हाची खीर हा एक पारंपारिक आणि पौष्टिक पदार्थ आहे, जो नागपंचमीच्या दिवशी आवर्जून बनवला जातो.
- गव्हाला 2-3 तास पाण्यात भिजत ठेवा.
- भिजवलेले गहू मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- एका पातेल्यात तूप गरम करून त्यात वाटलेले गहू आणि गव्हाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.
- आवश्यकतेनुसार पाणी आणि दूध घालून चांगले मिक्स करून घ्या.
- गूळ आणि वेलची पूड, जायफळ पूड घालून चांगले मिक्स करा.
- गरमागरम गव्हाची खीर सुक्यामेव्याने सजवून ‘नागपंचमी स्पेशल’ खीर तयार आहे





