सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशा वेळी लोक उपवास आणि उपासनेत अधिक व्यस्त असतात. असे बरेच लोक आहेत जे दिवसभर काहीही खात नाहीत आणि काहींना उपवासात फलाहार घेणे आवडते. श्रावण महिन्यात मांसाहार करत नसल्यानं आपण शाकाहारी पदार्थांचे वेगवगळे बेत करतो. शिवाय सणावाराच्या निमित्तानं, श्रावणी सोमवारच्या निमित्तानं नैवेद्याचं ताट सजवायचं असतं. त्यासाठी खास ओल्या नारळाच्या करंज्या कश्या बनवायच्या याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत…
साहित्य
बाह्य आवरण
- १ वाटी मैदा
- १/२ वाटी रवा
- १/२ चमचा मीठ
- २ चमचे तेल
- पाणी
सारण
- २ वाट्या ओल्या नारळाचा चव
- १ वाटी गूळ
- १/२ वाटी साखर
- १/४ चमचा वेलची पूड
- १ चमचा खसखस
- १/४ कप चिरलेले सुके मेवे
- १ चमचा साजूक तूप
कृती
सारण तयार करणे
- एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खसखस थोडी भाजून घ्या.
- त्यात ओला नारळ, गूळ आणि साखर घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवा.
- वेलची पूड आणि सुके मेवे घालून चांगले मिक्स करा.
- मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
पिठाचा गोळा तयार करणे
- मैदा, रवा, मीठ आणि तेल मिक्स करून त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.
- मळलेले पीठ 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
करंज्या बनवणे
- पिठाचे छोटे गोळे करून घ्या.
- प्रत्येक गोळ्याला वाटीच्या आकाराचे लाटून घ्या.
- त्यात नारळाचे सारण भरून किनारी दुमडून घ्या.
- करंजीला विशिष्ट आकार देण्यासाठी करंजीच्या साच्याचा (karanji mould) वापर करू शकता.
तळणे
- कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर करंज्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
टीप
- करंज्या तळताना तेल जास्त गरम नसावे, नाहीतर करंज्या लवकर लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील.
- सारण जास्त ओले नसावे, नाहीतर करंज्या तळताना फुटण्याची शक्यता असते.
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारणात ड्रायफ्रुट्स आणि वेलचीची पूड वाढवू शकता.





