२०२५ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. या दिवशी रात्री १२:०४ ते १२:४७ या वेळेत ‘निषिता पूजा’चा शुभ मुहूर्त असून, मध्यरात्री १२:२६ हा भगवान कृष्णाचा जन्माचा क्षण मानला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार, १६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होईल. जन्माष्टी आणि दहीहंडीचे हिंदू धर्मियांमध्ये विशेष महत्व आहे, या सणांचा उत्साह महाराष्ट्रासह उत्तर भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
श्रीकृष्णाच्या जन्माचा भव्य उत्सव
जन्माष्टमी हा भगवान विष्णूंच्या आठव्या अवतार श्रीकृष्णाच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे. पुराणकथेनुसार, कृष्णांचा जन्म मथुरेत कंसाच्या कारागृहात झाला आणि नंतर त्यांना गोकुळात यशोदा-मधील घरी नेण्यात आले. या दिवशी भक्त उपवास करतात, मध्यरात्री पूजा-अर्चा करतात आणि भजन, कीर्तन, कृष्णलीला यांचे आयोजन करतात. दहीहंडीचा सण कृष्णाच्या बाललीलेवर आधारित आहे, जिथे तो आपल्या मित्रांसोबत लोणी-दही चोरण्याचा खेळ करत असे. या स्मरणार्थ गोविंदा पथके उंच मानवी मनोरे रचून हंडी फोडतात. या सणात श्रद्धा, भक्ती, खेळकरता, संघभाव, धैर्य आणि सामाजिक एकोप्याचा संदेश आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून, जन्माष्टमी भक्तांना धर्म, नीती आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, तर दहीहंडी उत्सव एकत्रित प्रयत्न, सहकार्य आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो.
दहीहंडीची सुरुवात कशी झाली?
पौराणिक कथेनुसार, लहान असताना भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत लोणी आणि दही चोरी करून खात असत. त्यांच्या या बाललीलांमुळे गोकुळातील महिला खूप त्रस्त होत्या. त्यांनी लोणी आणि दह्याची मटकी उंच ठिकाणी लटकवण्यास सुरुवात केली, जेणेकरून श्रीकृष्ण तिथे पोहोचू शकणार नाहीत. पण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांना घेऊन मानवी पिरामिड तयार करून या उंच हंड्यांपर्यंत पोहोचायचे आणि लोणी-दही चोरून खायचे. श्रीकृष्णाच्या याच बाललीलांना श्रद्धांजली म्हणून, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव आनंद, एकजूट आणि संघभावना दर्शवतो. हे दोन्ही दिवस महाराष्ट्रातील वातावरण देखील भक्तीमय झालेले असते आणि उत्साहाने भरलेले असते.
दहीहंडीचा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील मथुरा, वृंदावन आणि गोकुळ यांसारख्या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाते, ज्यात अनेक गोविंदा पथके सहभागी होतात. या सणाच्या साजरीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येते.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.





