MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

घराचा अथवा ऑफिसचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? कोणती दिशा शुभ, कोणती अशुभ? जाणून घ्या सगळं काही!

Written by:Rohit Shinde
घराचा दरवाजा नेमका कोणत्या दिशेला असावा? या बाबीला वास्तूशास्त्रामध्ये विशेष महत्व आहे. नेमके यामध्ये काय संकेत आहेत, ते सविस्तर समजून घेऊ...
घराचा अथवा ऑफिसचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? कोणती दिशा शुभ, कोणती अशुभ? जाणून घ्या सगळं काही!

खरंतर नवे घर बांधताना अथवा फ्लॅट किंवा ऑफिस खरेदी करताना काही बाबींची प्रामुख्याने काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये तुमचे घर, ऑफिस अथवा फ्लॅटच्या दरवाजाची दिशा योग्य असणे अत्यंत जरूरीचे आहे, अशा परिस्थितीत याबाबत सविस्तर जाणून घेणे महत्वाचे ठरते. घर बांधताना किंवा विकत घेताना प्रत्येकजण पहिली गोष्ट विचारात घेतो ती म्हणजे मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा. वास्तुशास्त्रानुसार दरवाज्याची दिशा ही घरातील सुख-शांती, आरोग्य, संपत्ती आणि कुटुंबातील नाते संबंध यावर मोठा प्रभाव टाकते. त्यामूळे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

उत्तर आणि पूर्व सर्वाधिक शुभ दिशा

खरंतर यामध्ये उत्तर आणि पूर्व दिशा अधिक शुभ मानली जाते. पूर्व ही दिशा सुर्याची आहे. सुर्योदय पूर्वेकडून होतो आणि त्यामुळे या दिशेला पवित्रता व ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. घराचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे मानले जाते. आरोग्य, बुद्धिमत्ता आणि कुटुंबातील प्रगतीसाठी ही दिशा उत्तम मानली जाते. विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे यांच्यासाठी ही दिशा अत्यंत शुभ आहे. उत्तर ही दिशा कुबेराची म्हणजेच धनदेवतेची आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तरेला असेल तर घरात पैशांचा प्रवाह वाढतो, व्यवसाय-नोकरीत प्रगती होते आणि समृद्धी टिकून राहते. व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती यांनी ही दिशा निवडल्यास आर्थिक स्थैर्य वाढते असे मानले जाते.

यामध्ये घराची ईशान्य दिशा देखील काही प्रमाणात योग्य आहे. ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा ही सर्वात पवित्र मानली जाते. या दिशेला घराचा मुख्य दरवाजा असेल तर घरात नेहमी शांती, सुख-समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती होते असे वास्तुशास्त्र सांगते. बहुतेक वास्तु-तज्ज्ञ या दिशेला दरवाजा असणे सर्वात शुभ मानतात.

पश्चिम-दक्षिणेकडे दरवाजा का नसावा?

पश्चिम ही दिशा वरुणदेवाची आहे. वास्तुनुसार पश्चिमेकडे दरवाजा असणे फारसे शुभ मानले जात नाही. पण काही ठिकाणी योग्य वास्तु-उपाय करून पश्चिमेकडील दरवाजाही योग्य ठरू शकतो. साधारणपणे या दिशेला दरवाजा असल्यास कुटुंबात तणाव वाढतो, खर्च वाढतो आणि मनःशांती कमी होते असे मानले जाते. मात्र पश्चिमोत्तर (North-West) दिशा तुलनेने थोडी अधिक चांगली असते. दक्षिण ही दिशा यमाची म्हणजेच मृत्यू देवतेची मानली जाते. वास्तुशास्त्रात दक्षिणेकडे दरवाजा असणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा घरात वारंवार अडचणी, आजारपण, आर्थिक संकटे आणि कुटुंबातील मतभेद दिसून येतात. काही ठिकाणी दक्षिण-पश्चिम (South-West) कोनात दरवाजा असेल तर तो आणखी अपशकुन मानला जातो. त्यामुळे घर बांधताना ही दिशा टाळावी हे उत्तम.

थोडक्यात, वास्तुशास्त्रानुसार…पूर्व, उत्तर, ईशान्य या दिशा घर, ऑफिस अथवा फ्लॅटच्या मुख्य दरवाजासाठी शुभ आहेत. तर दक्षिण, दक्षिण-पश्चिम या दिशा अशुभ आहेत. त्यामुळे तुम्ही देखील या बाबींची काळजी घेतल्यास नक्कीच फरक जाणवेल.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.