MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

सात महिन्यांच्या बाळासाठी केली महिलेची हत्या, बाळालाही जीवे मारण्याचा होता कट, कसं झालं उघड?

Written by:Smita Gangurde
Published:
पैशांच्या लोभापायी चिमुकल्याचा सौदा करण्यासाठी हत्या झालीय. इतक्या क्रूर, विकृत गुन्हेगारांना कायदा काय शिक्षा करतो. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय
सात महिन्यांच्या बाळासाठी केली महिलेची हत्या, बाळालाही जीवे मारण्याचा होता कट, कसं झालं उघड?

गोंदिया – गोंदियाच्या खजरी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ माजली होती. या प्रकरणाचा तपास करताना एकाहून एक धक्कादायक खुलासे झाले आणि अखेरीस बाळाच्या विक्रीसाठी महिलेची हत्या झाल्याचं हादरवून सोडणारं कारण समोर आलं

या प्रकरणात सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. कोण होती ती महिला? आणि का झाली तिची हत्या, जाणून घेऊयात

नेमकं काय घडलं?

3 ऑगस्टच्या सकाळी गोंदियाच्या सडक अर्जूनीच्या खजरी शेतशिवारात आढळलेला हा महिलेचा मृतदेह..
अज्ञातानं तिच्या गळ्यावर वार करत अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली होती. या बातमीमुळे गोंदिया जिल्हा हादरून गेला होता. या महिलेची ओळख पटवणं हे सगळ्यात अवघड आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं.तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली..

13 दिवसांनी त्या महिलेची ओळख पटली. छत्तीसगडच्या भिलाईतील मुळ रहिवासी असलेल्या अनू ठाकूरचा तो मृतदेह होता. तिची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी एक एक धागा जोडायला सुरुवात केली. जसजसा उलगडा होत गेला, तसतसे एकाहून एक धक्कादायक खुलासे होऊ लागले. या महिलेच्या बाळाची विक्री करण्यासाठी तिच्या प्रियकरानंच हा खून केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

का केली महिलेची हत्या?

अनू ठाकूर आणि आरोपी सिद्धार्थ तूरकर दोघेही भिलाईचे रहिवासी आहेत.दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. सध्या गोंदियाच्या गोरेगावातील डोंगरुटोला या भागात राहत होते. सिद्धार्थच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. ते कर्ज फेडण्यासाठी त्यानं अनूची हत्या केली. त्यानंतर तिच्या सात महिन्यांच्या बाळाची विक्री केली. त्यासाठी साथीदारांच्या मदतीनं खोटी कागदपत्रंही बनवली. पत्नी पूनम तुरकरसह काही नातेवाईकही सामील होते.

कठोर शिक्षेची मागणी

19 दिवसांच्या तपासानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला. अखेर पोलिसांनी आरोपी सिद्धार्थसह सात जणांच्या मुसक्या आवळल्या. अनेकदा संपत्ती, अनैतिक संबंध एखाद्याच्या जीवावर बेतण्याचं निमित्त ठरत असतात. मत्र इथं पैशांच्या लोभापायी चिमुकल्याचा सौदा करण्यासाठी हत्या झालीय. इतक्या क्रूर, विकृत गुन्हेगारांना कायदा काय शिक्षा करतो. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय