संभाजीनगर- औद्योगिक वसाहतीत अवघ्या काही हजारांवर 12-12 तास मजुरांना राबवण्यात येतं. यात अनेकदा जीवावर उदार होऊन या स्त्री-पुरुष मजुरांना काम करावं लागतं. अनेकदा योग्य प्रशिक्षण न देता मजुरांकडून अवघड कामे करुन घेतली जातात. यातून बऱ्याचदा मोठे अपघातही घडतात. संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका तरुण कामगार महिलेचा हात मशिनमध्ये अडकल्यानं तिला तिचा हात गमवावा लागलाय. या महिलेला दोन लहान मुलं आहेत, आता या मुलांचा सांभाळ करायचा तरी कसा अशा प्रश्न तिच्यासमोर आणि कुटुंबीयांसमोर पडलाय. औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या जीवाशी खेळ होतोय का, हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं?
या दुर्घटनेत हात गमवावा लागलेल्या महिला कामगाराचं नाव आहे पूजा पांचाळ. या महिलेचं वय अवघं 23 वर्षांचं आहे. नांदेडमधून कामाच्या शोधात पती आणि दोन मुलांसह पूजा संभाजीनगरला आली होती. संभाजीनगर औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत मजूर म्हणून ती कामाला लागली.
कोणतंही प्रशिक्षण नसताना पूजा पांचाळला चक्क मोल्डिंग मशीनवर ऑपेरटर म्हणून बळजबरीनं काम करायला भाग पाडण्यात आलं. या कामाचा अनुभव नसल्यानं घडायला नको तेच घडलं. मोल्डिंग मशीनमध्ये तिचा उजवा हात धडावेगळा झाला.
आता हात गमावल्यानंतर दोन लहान लहान लेकरांचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न पूजला पडलाय.
कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मात्र हात गमावल्यानंतरही कंपनीकडून पुजाला साधी दमडीचीही मदत मिळालेली नाही यानिमित्तानं वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये कंपनी मालक आणि कंत्राटदार कामगारांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
पैसे वाचवण्यासाठी जीवाशी खेळ
प्रेसिंग मशीन ऑपरेटरला जादा पगार द्यावा लागतो. पैसे वाचवण्यासाठी अप्रशिक्षित कामगारांना मशीनवर काम करण्यास भाग पाडलं जातं. आणि मग पूजासारखा हात गमवावा लागतो किंवा वेळप्रसंगी ते कामगारांच्या जीवावरही बेततं. कामगार कायदे आहेत, पण ते फक्त कागदावर. त्यांचा प्रत्यक्ष लाभ कामगारांना कधीच मिळत नाही, आणि पूजासारख्या तरुण महिला कामगारांना त्याची जबर किंमत मोजावी लागते. तरुण वयात हात गमावणाऱ्या या पूजानं पुढं करायचं तरी कायय, असा सवाल आता तिचे कुटुंबीय विचारतायेत.











