पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये शुक्रवारपासून तणाव निर्माण झाला आहे. शिवरायांच्या मूर्तीची विटंबना आणि त्यानंतर एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केलेली आक्षेपार्ह पोस्ट यामुळे यवतमध्ये जमावाकडून हल्ला झाला होता. आता मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून कलम १४४ लागू केलं आहे. नेमकं यवतमध्ये काय घडलं? जाणून घेऊ…
पुण्यातील यवतमध्ये नेमकं काय घडलं?
चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यावरुन यवतसह दौंड तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. शिवरायांच्या प्रतिमेची विटंबना केलेल्या आरोपीला तात्काळ अटक केली. शुक्रवारी यवतमध्ये काल गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्गुरु स्वामी हेमांगी सखीजी यांची भाषणं झाली. त्यानंतर फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून पुन्हा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर शुक्रवारी थेट सकाळी बाजारपेठ बंद करण्यात आली.

काही घरांना, बेकरी आणि धर्मस्थळांवर जमावाने हल्ला केला. यात काही दुकानं आणि घरांना आगी लावण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
अजित पवारांची मध्यस्थी; तणाव निवळला!
पुणे जिल्ह्यातील यवत गावात आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टमुळे तणाव निर्माण झाला. दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. काही घरांवर दगडफेक करण्यात आली. रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च केला आणि जमावबंदीचे आदेश लागू केले. एका वेळी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. कुठलेही आंदोलन, सभा किंवा मोर्चे काढण्यास बंदी घालण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवत गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
त्यांनी पोलिस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. पुणे ग्रामीणचे एसपी संदीपसिंग गिल यांनी अजित पवार यांना सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची माहिती घेतली. अजित पवार यांनी नुकसान झालेल्या घरांची आणि वाहनांची पाहणी केली. या सर्व घटनांनंतर आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे.











