नवी दिल्ली – दिल्लीतील विद्यार्थिनी लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी चैत्यनानंद याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या चैत्यनानंद यांना आग्र्याच्या एका हॉटेलमधून पकडण्यात आलं. त्याच्याकडे असलेली यूएन-ब्रिक्सशी संबंधित बनावट व्हिजिटिंग कार्डही जप्त करण्यात आली आहेत.
भगव्या कपड्यातील चैत्यनानंद नावाच्या या सैतानाला अखेर आगरा पोलिसांनी गजाआड केलंय. केलेल्या कुकर्माचा कोणताही पश्चाताप अटकेच्या वेळी चैत्यनानंदच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पतियाळा कोर्टात आरोपीच्या हजेरीनंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमकं काय प्रकरण?
दिल्लीच्या वसंतकुंज परिसरातील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट कॉलेजच्या रिसर्च विभागाचा प्रमुख म्हणून चैत्यनानंद कार्यरत होता. 17 विद्यार्थिनींनी चैत्यनानंदच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर चिन्मयानंद फरार झाला होता. चैत्यनानंदचं शेवटचं लोकेशन आग्र्याचं असल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी हॉटेलातून चैतन्यानंदला अटक केली. हॉटेलमध्ये एन्ट्री करताना त्यानं पार्थ सारथी हे नाव सांगितलं होतं.
कसं करत होता विद्यार्थिनींचं शोषण? चैत्यनानंद बाबा की सैतान?
चैत्यनानंद विद्यार्थिनींना धमकावत असे, त्यांना अश्लील मेसेजही पाठवत होता. रात्री उशिरा खोलीत बोलवून कमी ग्रेड देण्याची धमकीही चैत्यनानंद विद्यार्थिनींना देत होता.
1. चैत्यनानंदकडून विद्यार्थिनींना बेबी, आय लव्ह यू सारखे मेसेज पाठवीत असे.
2. मुलींच्या केसांचं आणि कपड्यांचं कौतुक करत होता.
3. तीन वॉर्डन आणि फॅकल्टीही करत होते मदत
4. विद्यार्थिनींवर दबाव टाकून चॅट डिलिट करण्यात इतरांचा सहभाग होता.
5. आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या ईडब्ल्यूएस कोट्यातली विद्यार्थिनी बाबाचं लक्ष्य
6. चौकशीत 32 विद्यार्थिनींपैकी 17 विद्यार्थिनींनी केली बाबाची तक्रार
7. गर्ल्स होस्टेलमध्ये सिक्रेट कॅमेरे लावल्याचाही आरोप
8. 17 विद्यार्थिनींची लैंगिक शोषणाची तक्रार
विद्यार्थिनींना परदेशात नेण्याचं आमिष दाखवून चैत्यनानंद त्यांच्यावर अत्याचार करत होता.
कारवाई खरंच होणार का ?
चैत्यनानंदवर यापूर्वीही 2009 आणि 2016 साली फसवणुकीचे आणि छेडछाडीचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. दिल्ली पोलिसांनी चैत्यनानंदकडे असलेली यूएन-ब्रिक्सशी संबंधित बनावट व्हिजिटिंग कार्डही जप्त केली आहेत. चैतन्यानंदच्या नावावर असलेली मॅनेजमेंटची पुस्तक जगाला मार्गदर्शक असल्याचा दावाही यापूर्वी करण्यात आलेला आहे. आता गजाआड झालेल्या चैतन्यानंदच्या चौकशीत अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी अनेक आरोप चैत्यनानंदवर झाले, मात्र कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता तरी चैतन्यानंदवर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे











