मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. सीमाशुल्क विभागाने २९ आणि ३० जुलै रोजी मोठी कारवाई करत ८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. बँकॉकहून आलेल्या चार प्रवाशांना अटक करण्यात आली. गांजा अतिशय हुशारीने लपवण्यात आला होता. एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणाचा आता सीमाशुल्क विभागाकडून अधिकचा तपास सुरू आहे.
8 कोटींचे ड्रग्ज जप्त; 4 जण अटकेत
२९ आणि ३० जुलै रोजी केलेल्या विशेष कारवाईत, अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून तब्बल ८ किलोहून अधिक हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी व्हिएतजेट फ्लाइट क्रमांक VZ760 ने बँकॉकहून आलेल्या तीन प्रवाशांना अडवले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये १.९९० किलो हायड्रोपोनिक गांजा सापडला. हा गांजा अत्यंत चलाखीने काळ्या आणि पारदर्शक प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये व्हॅक्यूम सील करून लपवण्यात आला होता. या साठ्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. या तिन्ही प्रवाशांना एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

दोन वेग-वेगळ्या कारवाया समोर
दुसऱ्या एका कारवाईत इंडिगो फ्लाइट क्रमांक ६E१०६० ने बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या हालचालींवरून अधिकाऱ्यांना संशय आला. तपासणी केल्यावर, त्याच्या चेक-इन बॅगमध्ये ६.०२२ किलो हायड्रोपोनिक गांजा आढळला, ज्याची किंमत सुमारे ६ कोटी रुपये आहे. हा गांजाही अत्यंत हुशारीने लपवण्यात आला होता. या प्रवाशालाही एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत. सीमाशुल्क विभागाची मुंबई विमानतळावरील सतर्कता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अशा कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे.











