पुणे- ड्रग्ज पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्ह आहेत.
त्यांच्याविरोधात मानवी तस्करीचा आरोप करण्यात आलाय. तसंच महिला आयोगानंही खेवलकर यांच्या चौकशीचे आदेश दिलेत.

मानवी तस्करीचा काय आरोप?
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर मानवी तस्करी केल्याचा आरोप करण्यात आलाय. बीडमधील प्रज्ञा खोसरे यांच्या सेवाभावी संस्थेनं राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून हा गंभीर आरोप केलाय.
27 जुलैला पुणे पोलिसांनी खराडीच्या हॉटेलात रेव्ह पार्टीवर छापा टाकून 7 आरोपींना अटक केली, त्यामध्ये काही महिलांचा समावेश आहे. आरोपी प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावानं हॉटेलमध्ये रुम बुक करून अनेकवेळा मुलींना तिथं बोलावलं प्रत्यक्षात या मुली परप्रांतीय असून, त्यांना आमीष दाखवून आणल्याचं रॅकेट दिसतंय
28 वेळा रुम बुक करणं, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार दिसतो, असा संशय संस्थेनं तक्रारीत व्यक्त केलाय
याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा, असा आदेश राज्य महिला आयोगानं पुणे पोलीस आयुक्तांना दिलाय
तक्रारीनंतर रोहिणी खडसेंची टीका
कु. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याची संस्था आहे, याकडं रोहिणी खडसे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून लक्ष वेधलंय. ज्या संस्थेनं महिला आयोगाकडे तक्रार केली ती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप झाले, तेव्हा ही संस्था कुठं होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली?. आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे. अशी टीका रोहिणी खडसेंनी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी हनी ट्रॅप प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या जावयाला अडकवलं जात असल्याचा प्रत्यारोप आमदार रोहित पवार यांनी केलाय..
महिला आयोगावरुन नवा वाद रंगणार?
प्रांजल खेवलकर प्रकरणात आता पुणे पोलीस नेमका काय अहवाल देतात? आणि राज्य महिला आयोग काय कारवाई करणार? याकडं आता लक्ष लागलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. या प्रकरणात महिला आयोगाच्या एन्ट्रीमुळं चाकणकर विरुद्ध रोहिणी खडसे असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हं आहेत.











