पिंपरी-चिंचवडमधून मोठी बातमी समोर येत आहे. येथे मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे. यात 37 वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुरम चौकाजवळ ही घटना घडली आहे.
मित्रांनीच मित्राचा काटा काढला !
अलंकापुरम 90 फुटी रोडवर श्री साई रोड कॅरिअर या ठिकाणी साडेपाच ते 6 वाडण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी काळ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीत बसलेले असताना नितीन शंकर गिलबिले यांच्यावर त्यांचेच मित्र अमित जीवन पठारे आणि विक्रांत ठाकुर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात नितीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा आता मृत्यू झाला आहे.

मयत नितीन गिलबिले आणि अमित पठारे, विक्रांत ठाकूर हे तिघेही एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघे जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू
ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. संशयित आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर पसार झाले आहेत. त्यांचा शोध दिघी पोलीस घेत आहेत. घटनास्थळी दिघी पोलीस आणि गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी धाव घेतली होती. अद्याप हत्येचं कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
मृतक नितीन गिलबिले आणि आरोपी मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तीनही मित्र जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.











