पुणे शहर हे आधी शिक्षण, आयटी आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत शहर म्हणून ओळखले जात असे, मात्र गेल्या काही काळात येथे गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. आंदेकर आणि कोमकर टोळीमध्ये भडका उडाला आहे. अशातच कुख्यात गँगस्टर निलेश घायवळच्या टोळीने कोथरूडमध्ये गोळीबार करत एका जणावर कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी घायावळ टोळीवर मोक्का लावला आहे.
निलेश घायवळ टोळीवर मोक्का
कोथरूडमध्ये घायावळ टोळीने एका व्यक्तीवर हल्लाा केला होता. चार आरोपींनी गोळीबार करत कोयत्याने वार केले होते. कोथरूड परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर कोथरूड पोलिसांनी या चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या चारही हल्लेखोरांची कसून चौकशी केली असता या सगळ्या प्रकरणी निलेश घायवळ आणि त्याच्या इतर साथीदारांचा थेट सहभाग असल्याचं उघड झालं आहे. आता पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.

निलेश घायवळच्या टोळीतील चार जणांनी कोथरूड भागामध्ये एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केला होता. मध्यरात्री ही घटना घडली होती. प्रकाश धुमाळ यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता. गाडीला साईड दिली नाही या क्षुल्लक कारणातून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात प्रकाश धुमाळ जखमी झाले होते. त्यांना तातडीने पुण्यातील कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात दाखल केलं होतं.
वाढती गुन्हेगारी; नागरिक भयभीत
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. विशेषत: गँगवॉर, चोरी-चाकरी, मारहाणी आणि चोरीसारख्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक रात्री बाहेर जाण्यापासून टाळतात, दुकाने आणि व्यवसायात सुरक्षा उपाय वाढवले जातात. घराबाहेर जाण्यापूर्वी सतर्क राहणे गरजेचे ठरते. पोलिस प्रशासनाकडून गुन्हेगारांविरोधात कारवाई होत असली तरी नागरिकांना सुरक्षिततेची खात्री मिळणे कठीण झाले आहे. यासाठी नागरिकांनी जागरूक राहून सावधगिरी बाळगणे, शिस्तीत राहणे आणि पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. वाढती गुन्हेगारी केवळ कायदेशीर उपायांनी नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक उपायांनीही कमी करता येऊ शकते.