मुंबईतील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट आणि तस्करी हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक मुद्दा बनला आहे. शहरातील बंदरांचा आणि आंतरराष्ट्रीय संपर्कांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. या रॅकेटमागे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत मुंबई क्राईम ब्रांचने आता एक मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.
ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड अटकेत
मुंबई क्राइम ब्रांचने आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटवर मोठी कारवाई केली आहे. ड्रग्सच्या तस्करी प्रकरणात एका मुख्य मास्टरमाइंड दुबईतून अटक करण्यात आली आहे. शेरा बाटला नावाचा हा आरोपी ड्रग सिंडिकेटचा महत्त्वाचा भाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. त्याला दुबईतून डिपोर्ट करून मुंबईत आणले आहे. या प्रकरणात आधीच सलीम डोला, ताहिर सलीम डोला आणि मुस्तफा यांसारखे प्रमुख आरोपी अटकेत आहेत. विदेशात बसून तो भारतात ड्रग्जचे साम्राज्य चालवत होता. यामुळे मुंबईसह तेलंगणा, मैसूर आणि अकोल्यातील अनेक मोठ्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज तस्करीच्या या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटमध्ये एकूण चार मोठे ड्रग्ज डीलर सहभागी होते. काही दिवसांपूर्वी ड्रग्ज डीलर सलीम डोलावर मोठी कारवाई करण्यात आली होती. शेरा बाटला हा या सिंडिकेटमधील चौथा आणि महत्त्वाचा आरोपी आहे. मुंबई क्राईम ब्रांचसाठी ही अटक मोठी आणि महत्त्वाची ठरली आहे.
घाटकोपर ड्रग्ज प्रकरणाशी संबंध
2022 मध्ये घाटकोपर येथे जे ड्रग्ज प्रकरण समोर आले होते, त्या केसमध्ये शेरा बाटला हा फरार आरोपी होता. घाटकोपर केसमध्ये 995 ग्रॅम मेफेड्रिन (MD) जप्त करण्यात आले होते. या ड्रग्जच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य आणि पैसे हस्तांतरणाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. यात शेरा बाटलाचा सहभाग स्पष्ट होतो. शेरा बाटलाला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोपीची नेमकी भूमिका काय आहे आणि हे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट भारतातील अन्य कोणत्या राज्यांशी जोडलेले आहे. यासंबंधीचा कसून तपास मुंबई क्राईम ब्रांच करत आहे. या अटकेतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.











