51 लाख भरलेल्या दोन बॅगा आणि गुजरातहून ‘तो’ थेट पुण्यात; पोलिसांच्या नजरेस पडला आणि खेळ संपला!

जप्त रोख रक्कम व संबंधित व्यक्ती यांना आवश्यक कार्यवाहीसाठी विधिवत आयकर विभाग, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील चौकशी आयकर विभाग करीत आहे.

पुणे स्थानकात पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. पुणे आरपीएफने ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत पुणे रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करत गुजरातमधील एका व्यक्तीकडून तब्बल 51 लाख रुपये जप्त केले आहे. पुढील चौकशीसाठी या संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पुणे आरपीएफकडून देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

फरदीनखान जफरउल्ला खान मोगल (वय 24 वर्ष, रा. मेहसाणा गुजरात) असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त व सहाय्यक सुरक्षा आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे स्थानकावरील BSM वर सामान तपासणीदरम्यान फरदीनखान जफरउल्ला खान मोगल (वय 24 वर्ष, रा. मेहसाणा गुजरात) या तरुणाकडे दोन बॅगा आढळल्या. त्या दोन्ही बॅगांमधून एकूण 51 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. पैशांबाबत समाधानकारक माहिती देण्यात फरदीनखान जफरउल्ला खान मोगल अपयशी ठरल्याने त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

कसून तपास सुरू

आढळलेल्या एका जांभळ्या रंगाच्या बॅगेतून अंदाजे 22 लाख रुपये आणि लाल रंगाच्या बॅगेतून अंदाजे 29 लाख रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली आहे. जप्त रोख रक्कम व संबंधित व्यक्ती यांना आवश्यक कार्यवाहीसाठी विधिवत आयकर विभाग, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील चौकशी आयकर विभाग करीत आहे. हा व्यक्ती ही रोख रक्कम घेऊन नेमका कुठे जात होता. याचा देखील पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. याबाबत अधिकच्या माहितीची प्रतीक्षा आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News