पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा अलीकडच्या काळात चिंतेचा विषय बनला आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. एका दिवसात तब्बल 43 गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. आंदेकर प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर सातत्याने टीकेची झोड उठताना दिसत होती. त्यानंतर पोलिसांनी ही मोठा कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांची धडक कारवाई
गेल्या काही आठवड्यांपासून पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा हालचाली वाढल्या असून, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. परिमंडळ 1 चे उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कारवाई केली. या पथकाने मात्र 24 तासांत 43 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनेकजण हे शहरातील कुख्यात आंदेकर गँगचे सदस्य असून, काहींवर खून, हत्या प्रयास (कलम 307), दारूबंदी कायदा, शस्त्रबंदी कायदा आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

कायदा सुव्यवस्थेसाठी मोठे पाऊल
नवरात्रीच्या काळात कोणतीही हिंसक घटना घडू नये, यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील गुन्हेगारीचा आलेख रोखण्यासाठी, विशेषतः टोळ्यांचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांची ही मोहीम आहे. दरम्यान पोलिसांनी दुर्गामाता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देखील सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना दिल्या आहेत. अशा परिस्थितीत पोलीस या ठिकाणी दाखवत असणारी सतर्कता ऐनवेळी का दाखवत नाहीत, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करताना दिसत आहे. गुन्हेगारीला आळा घालणे, हे सध्या पुणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.











