नवी दिल्ली – दिल्लीतील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट या कॉलेजचे प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर 17 विद्यार्थिनींनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. बुधवारी हे प्रकरण जगजाहीर झालं.
या विद्यार्थिनी इन्स्टिट्यूटमध्ये आर्थिक मागास वर्गाच्या स्कॉलरशीप अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट करत होत्या. चैतन्यानंद यांच्यावर अभद्र भाषेचा प्रयोग, घाणेरडे अश्लील मेसेज पाठवणे आणि जबरदस्ती अंगाला स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीस तक्रारीनंतर चैतन्यानंद फरार
चैतन्यानंद सरवस्वती उर्फ पार्थ सारथी याच्याविरोधात 4 ऑगस्टला वसंत कुंड उत्तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यावेळी तो या इन्स्टिट्यूटचा प्रमुख होता. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी त्याला या पदावरुन बडतर्फ करण्यात आलं.
या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर चैतन्यानंद फरार झाला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत असून आता तो उत्तर प्रदेशात आगरा परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी कॉलेजच्या तळमजल्यावर असलेली चैतन्यानंद याची व्होल्हो कारही जप्त केली आहे.
चैतन्यानंद याच्या कारवर युनायटेड नेशनची नंबर प्लेट होती. साधारणपणे परदेशात नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशा नंबर प्लेट देण्यात येतात. हा नंबर यूएनमधून जारी झाला नसल्याचंही आता पोलिसांनी स्पष्ट केलंय. चैतन्यानंद यानं स्वताच अशी नंबर प्लेट गाडीला लावली होती.
संबंधित पीठानं दिलं स्पष्टीकरण
दिल्ली स्थित असलेली शारदा इन्स्टिट्यूट श्रृंगेरीतील श्री शारदा पीठाची शाखा आहे. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर शृंगेरी पीठानं या प्रकरणी भूमिका जाहीर केली आहे. स्वामी चैत्यनानंद यांची वागणूक आणि त्यांनी केलेली कृत्यं ही पीठांच्या हिताच्या विरोधात असल्याचं सांगत आता पीठाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलंय.
वॉर्डननं चैतन्यानंदांकडे नेलं होतं- विद्यार्थिनी
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मठ आणि मठाच्या संपत्तीचे प्रशासक पी ए मुरली यांनी चैतन्यानंद याच्या विरोधात 4 ऑगस्टला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चौकशीत 32 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले. यातील 17 विद्यार्थिनींनी चैतन्यानंद याच्या विरोधात लैगिंक शोषण केल्याचे आरोप केलेत. या इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या वॉर्डननं विद्यार्थिनी आणि चैतन्यानंद यांची भेट घडवून आणली असल्याचंही या विद्यार्थिनींनी सांगितलंय,
चैतन्यानंदची गुन्हेगारी पार्श्वभूमी
स्वामी चैत्यनानंद सरस्वती याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचं आता समोर योतेयं. 2009 साली त्याच्या विरोधात दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीत फसवणूक आणि छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2016 सालीही त्याच्याविरोधात महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. चैतन्यानंद नेमका कुठला आहे याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.











