मुंबई शहर आणि उपनगरांतील अल्पवयीन मुली आणि तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांना मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले.
ब्लॅकमेलिंग करत मुलीवर अत्याचार
या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत. या घटनेमुळे काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काळाचौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मुलीवर अत्याचार सुरु होते. सततच्या या अत्याचाराला कंटाळून अखेर मुलीने तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीना ताब्यात घेतले. ही पाच मुलं कोण आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही घटना उघडकीस आल्यानंतर काळाचौकी परिसरात संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, हे बघावे लागेल.












