कायम स्टारकिड्ससोबत वावरणारा आणि आपल्या चित्रविचित्र स्वभावामुळे चर्चेत असलेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. तब्बल 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलने ऑरीला समन्स बजावले आहेत. ऑरीला चौकशीसाठी आज अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेखला अटक केली होती. चौकशीदरम्यान या आरोपीने कबुली दिली की तो देशात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्यांचं आयोजन करतो आणि त्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठाही करतो.
ऑरीचा 252 कोटींच्या ड्रग्ज केसशी संबंध?
सोशल मीडिया स्टार ऑरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या ओरहान अवत्रामणि हा आता अडचणीत सापडला आहे. ऑरीची 252 कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा खुलासा 2022 मध्ये सुरू झाला होता. ओरी याला मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स सेलने (एएनसी) चौकशीसाठी बोलावले आहे. मुंबई क्राइम ब्रँचने फेब्रुवारी 2024 मध्ये एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडून 741 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले होते. तेव्हापासून सुरू झालेल्या या ड्रग केसमध्ये आतापर्यंत अनेक नामांकीत लोकांची चौकशी झाली आहे. आता ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे.

सांगलीतील ड्रग्ज प्रकरण; मुंबईत लागेबांधे
हे प्रकरण मार्च 2024 मधील आहे. मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रातील सांगली येथे मेफेड्रोन बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. अधिकाऱ्यांनी सुमारे 252 कोटी किमतीचे 126.14 किलोग्रॅम एमडी (मेफेड्रोन), एक सिंथेटिक उत्तेजक पदार्थ जप्त केला होता. सांगली येथे मेफेड्रोन बनवणारा कारखाना ड्रग तस्कर सलीम डोला आणि त्याचा मुलगा ताहीर चालवत होते, असा तपास अधिकाऱ्यांनी दावा केला होता. त्यांचा एक पंटर सूरत येथून कच्चा माल पुरवला जात होता, याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
ऑरीचं नाव नेमकं कसं समोर आलं ?
सांगली येथील ड्रग्स रॅकेटमध्ये अनेक नामांकीत लोकांचा हात आहे. संशय टाळण्यासाठी मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी गाड्यांमधून ड्रग्सची डिलिवरी केली जात होती. नफा हवालाच्या माध्यमातून विदेशात पाठवला जात होता. हे जाळे ऑगस्ट 2022 मध्ये नागपाडा येथील एका व्यक्तीच्या अटकेनंतर उघडकीस आले, त्यानंतर अनेकांना अटक झाली होती. ड्रग तस्कर आणि फरार गुंड सलीम डोलाचा सहकारी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखच्या अटकेनंतर ऑरीचे नाव समोर आले. शेखला 5 नोव्हेंबर रोजी दुबईहून परत आणण्यात आले होते. तेव्हापासून त्याची कसून चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान शेखने अनेक धक्कादायक खुलासे केले होते.