ठाणे, कल्याणचं दहशतवादी कनेक्शन पुन्हा उघड, दिल्ली पोलिसांनी उधळला दहशतवादी घातपाताचा कट

Smita Gangurde

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या विशेष एटीएस सेलने मोठ्या दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश केलाय. पाकिस्तानमधील हँडलर्सच्या आदेशानुसार भारतात दहशतवादी मॉड्यूल उभारलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि एटीएसनं 5 जणांना अटक केलीय. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रं, काडतुसे, रसायनं, आयईडी बनवण्याचं साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलीय.

पाकिस्तानी हँडलरने त्यांना खलिफत मॉडेल स्वीकारण्याचे आणि दहशतवाद्यांचे गट तयार करण्याचे आदेश दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे या 5 दहशतवाद्यांपैकी दोघेजण ठाणे आणि कल्याणमधले आहेत.

पाकिस्तानी दहशतवाद्यांचं ठाणे-कल्याण कनेक्शन

झारखंडचा अशरफ दानिश हा या दहशतवाद्यांचा म्होरक्या होत्या. स्वतःला सीईओ म्हणवणारा दानिश पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता.ठाण्याचा आफताब अन्सारीकडे टार्गेट किलिंगसाठी शस्त्रं मिळवून देण्याचं काम होतं.
त्याला आणि त्याचा साथीदार सुफियान अबुबाकर यांना दिल्लीत शस्त्रे घेताना अटक करण्यात आली.
मध्य प्रदेशच्या राजगड येथील कमरान कुरेशी आणि तेलंगणातील निजामाबाद येथील हुजैफा हे स्थानिक पातळीवर ऑपरेशन सांभाळत होते.

यापूर्वीही अनेक प्रकरणात पडघा, भिवंडी  या  पिरसरात दहशतवाद्यांचे स्लीपर सेल कार्यरत असल्याचं समोर आलं होतं. आता या प्रकरणात दोन दहशतवादी ठाणे, कल्याण परिसरातलेच असल्याचं समोर आल्यानं यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आता या परिसरात पुन्हा एकदा मोठी शोध मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.

आयईडी बॉम्ब तयार करण्याचा डाव

या दहशतवाद्यांकडून सल्फर पावडर, सल्फ्यूरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सोडियम बायकार्बोनेट, बॉल बेअरिंगसह आयईडी बनवण्याचं संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आलंय. काही संशयास्पद रेखाचित्रंही पोलिसांच्या हाती लागलीत. याप्रकरणी दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मुंबईमध्ये छापेमारी करण्यात आली.

 

दहशतवाद्यांना पाकिस्तानचं फंडिंग

दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून हवाला नेटवर्कद्वारे फंडिंग झाल्याचं प्राथमिक चौकशीत आढळलंय. या कारवाईनंतर मुंबईसह देशातील महानगरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. या कटात आणखी किती जण सामील आहेत, याचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या