कानपूर- हुंड्यावरुन सासरी होत असलेल्या सुनेच्या छळाची आणखी एक भयंकर कहाणी समोर आली आहे. या घटनेनं तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकेल. कानपूरमध्ये हुंड्याच्या पाच लाखांसाठी सुनेला एका खोलीत डांबून तिच्या खोलीत साप सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
कानपूर परिसरात 19 मार्च 2021 रोजी रेश्मा आणि शहनवाज यांचा विवाह झाला. मात्र नवऱ्याच्या कुटुंबाकडून हुंड्याची वाढत्या लोभापायी सगळ्या संसाराचा सत्यानाश झाला. हुंड्याच्या वाढत्या लोभामुळे लग्नानंतरच्या काही महिन्यांतच नात्यांवर त्याचा परिणाम झाला. 18 सप्टेंबरला रेश्मानं माहेरहून पाच लाख आणले नाहीत म्हणून तिला एका खोलीत कोंडण्यात आलं, आणि त्या खोलीत जिवंत साप सोडण्यात आला. त्यानंतर घाबरलेली रेश्मा जोरजोरात किंचाळत होती, मात्र तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं.

वाढत्या लालसेतून रेश्माचा छळ
रेश्माची बहीण रिजवाना हिनं दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी पाच लाखांची मागणी केली होती. रेश्माच्या वडिलांनी दीड लाखांची सोय केली. यानंतर रेश्मा सुखानं सासरच्या घरी नांदेल हा भ्रम खोटा ठरला. सासरी रेश्माला टोमणे ऐकावे लागत होते आणि धमक्याही देण्यात येत होत्या. रेश्मानं तिच्या वडिलांना फोन करुन हे सांगतिलं होतं आणि मदतही मागितली होती. सासरची मंडली तिला मानसिक आणि शारिरिक त्रास देत होते.
खोलीत असलेल्या रेश्मावर सापाचा हल्ला
रेश्माला खोलीत कोंडून ठेवून साप सोडल्यानंतर, सापानं तिच्या पायावर हल्ला केला. तिनं सासरच्यांकडून मदतीची याचना केली मात्र त्यांनी तिला अजिबात मदत केली नाही. अखेर तिनं तिच्या बहिणीला रिजवाना फोन लावला, रिजवाना आली आणि रेश्माची सापाच्या तावडीतून सुटका झाली. रेश्माला तातडीनं रुग्णालयात नेल्यानं तिचे प्राण वाचलेत.
पोलिसांकडून चौकशी आणि कारवाई
रिजवानानं या प्रकरणी पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केल्यानंतर रेशमाचा पती, सासू-सासरे, नणंद, नणंदेचा नवरा या सगळ्यांवर हत्येचा प्रयत्न, हुंड्यासाठी छळणे, षडयंत्र यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. रेशमावर अन्याय करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी आता जोर धरु लागली आहे.











