बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांचे चाहते जगभरात आहेत. पण हरियाणातील एका तरुणाने आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल जी वेड्यासारखी भक्ती दाखवली, ती ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. रोहतक जिल्ह्यातील महमजवळच्या खेरी गावातील 21 वर्षीय पंकज हा अक्षय कुमारचा इतका मोठा फॅन आहे की त्याने स्वतःच्या हातांनी रॉल्स रॉयससारखी आलिशान कार बनवून ती अक्षय कुमारला गिफ्ट देण्याचे स्वप्न पाहिले.
कोण आहे पंकज
पंकज मूळचा एका ऑटोमोबाइल सर्व्हिस सेंटरमध्ये डेंटर म्हणून काम करायचा. त्याला मेकॅनिकल आणि बॉडीवर्कची चांगली समज होती. अक्षयप्रती असलेल्या भक्तीमुळे त्याने नोकरी सोडली आणि तब्बल पाच महिने रात्रंदिवस मेहनत करून कार तयार केली.
हे ही वाचा
चार लाखांचे कर्ज घेऊन तयार केली कार
कार बनवण्यासाठी पंकजने रोहतक, दिल्ली, भिवानी आणि हिसारसारख्या शहरांमधून जुने स्पेअर पार्ट्स गोळा केले. सुरुवातीला वडील या निर्णयामुळे नाराज झाले, पण नंतर त्यांनीही पाठिंबा दिला. कुटुंबाने त्याला व्याजावर चार लाख रुपये उधार दिले. ऑक्टोबर महिन्यात कार पूर्ण तयार झाली.
यानंतर पंकजचा संपर्क अक्षय कुमारच्या पीएसओ राहुल यांच्याशी झाला. त्यांनी सांगितले की, “साहबला माहिती आहे, तुम्ही मुंबईत या.” हे ऐकून पंकज आनंदाने उड्या मारू लागला. 11 ऑक्टोबरला त्याने ट्रकमधून कार मुंबईला पाठवली. या कंटेनरचे भाडेच 1 लाख 10 हजार रुपये होते. पंकजसोबत गावातील आठ जण गेले होते. त्यांचे राहणे आणि जेवणावर सुमारे 1 लाख 20 हजार रुपये खर्च झाले.
सहा दिवस वाट पाहिली पण…
मुंबईत पोहोचल्यानंतर पंकजने अक्षय कुमारच्या घराबाहेर तब्बल सहा दिवस वाट पाहिली. सहाव्या दिवशी अक्षय कुमार बाहेर आले, त्यांनी फक्त “हाय-हॅलो” म्हणत नंतर भेटू असे सांगितले. पंकजने अजून दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला, पण त्यानंतर ड्रायव्हरने सांगितले की साहब विदेश गेले आहेत आणि कधी परत येतील ठाऊक नाही.
दाखवता आली नाही कार
हे ऐकून पंकजच कोलमडला. ना त्याला आपली कार अक्षयला दाखवता आली, ना गिफ्ट देता आली. निराश मनाने तो 19 ऑक्टोबरला परत हरियाणाला आला. या सगळ्या प्रवासात पंकजवर आता एकूण आठ लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. मात्र त्याने हार मानलेली नाही. तो आता ही खास बनवलेली कार हरियाणवी चित्रपट आणि नाटकांच्या शूटिंगसाठी भाड्याने देण्याचा विचार करत आहे, जेणेकरून काहीतरी उत्पन्न होईल.
10 नोव्हेंबरपासून त्याने पुन्हा रोहतकमधील महिंद्रा कंपनीत डेंटर म्हणून नोकरी सुरू केली आहे. पंकज म्हणतो, “अक्षय सरांना कार गिफ्ट करण्याचं माझं स्वप्न अजून जिवंत आहे. एक दिवस नक्की त्यांना ती दाखवेन.” असा निश्चय त्याने व्यक्त केलाय.