Bigg Boss स्क्रिप्टेड असते का? कसे निवडले जातात स्पर्धक?

Asavari Khedekar Burumbadkar

Bigg Boss हा भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो आहे. या शोमध्ये वादविवाद, भांडणं आणि नाट्य नसतील, असं होणं जवळजवळ अशक्य आहे. पण या शोच्या लोकप्रियतेसोबतच प्रत्येक सीजनमध्ये एक प्रश्न कायम विचारला जातो  “बिग बॉसमधील स्पर्धक कसे निवडले जातात? आणि हा शो स्क्रिप्टेड असतो का?” याबाबत अनेक अफवा दरवर्षी उठतात. काही लोकांचं मत असतं की शोचा विजेता आधीच ठरवला जातो, तर काहींचं म्हणणं असतं की काही स्पर्धकांना ठरावीक कालावधीसाठी करारावर आणलं जातं आणि त्यांना बाहेर काढण्यास मनाई असते.

या वर्षी अशा चर्चा मृदुल तिवारी, गौरव खन्ना आणि कुनिका सदानंद यांच्याभोवती फिरत आहेत. असं म्हटलं जातंय की या तिघांना करारावर ठरावीक वेळेसाठी घरात प्रवेश दिला आहे. यावर अखेर शोचे प्रोड्यूसर ऋषी नेगी यांनी मौन सोडलं आणि इंडियाटुडे सोबतच्या मुलाखतीत शोच्या कास्टिंगबद्दल आणि निवड प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली.

ऋषी नेगी यांनी स्पष्ट केलं की बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही स्पर्धकाला मिनिमम गॅरंटी (एमजी) दिली जात नाही. प्रत्येक आठवड्यात त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना मानधन दिलं जातं. जर कुणी गॅरंटीवर आला, तर त्याच्याकडून शोमध्ये सहभागाची अपेक्षा राहणार नाही आणि तो स्वतःला सुरक्षित समजेल. त्यामुळे असा करार शोच्या आत्म्याच्या विरोधात आहे. त्यांनी सांगितलं की शो यशस्वी होण्यासाठी योग्य कास्टिंग होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांची टीम जवळपास सहा महिने देशभर आणि परदेशात शोध घेत असते.

नेगी म्हणाले की या वर्षी टीमने सुमारे ५०० लोकांशी भेट घेतली. काही वेळा या शोधासाठी देशातील विविध ठिकाणी प्रवासही करावा लागतो. टीमचा उद्देश ‘नाव’ नव्हे तर ‘किरदार’ शोधणं असतो. लोकांना असं वाटतं की शोमध्ये मुद्दाम वादग्रस्त लोकांना घेतलं जातं, पण नेगी यांच्या मते, या वर्षीचा एकही स्पर्धक वादग्रस्त नाही. सर्वजण आपापल्या स्वभावात, पार्श्वभूमीत आणि भाषेत वेगळे आहेत. हाच विविधतेचा मेळ शोला मनोरंजक बनवतो.

कास्टिंगची प्रक्रिया 3 टप्प्यांत

कास्टिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांत होते. सुरुवातीला टीम संभाव्य स्पर्धकांशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर संवाद साधते. त्यानंतर निवडलेल्या व्यक्तींशी प्रत्यक्ष भेटून सखोल चर्चा केली जाते. या प्रक्रियेत स्पर्धकाचा स्वभाव, त्याची प्रतिक्रिया देण्याची पद्धत, ताणतणाव हाताळण्याची क्षमता तपासली जाते. नेगी म्हणाले, “हा कोणताही अभिनयाचा ऑडिशन नाही. आम्ही पाहतो की एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीत कशी वागते. त्याची खरी व्यक्तिमत्व शोमध्ये किती रिअल दिसेल, हे आमच्यासाठी महत्त्वाचं असतं.”

शोमध्ये काही वेळा स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याचे मुद्दे उघड होताना दिसतात. प्रेक्षकांना वाटतं की निर्माते मुद्दाम जुने नाते किंवा वाद उकरून काढतात, पण नेगी यांनी हे खोडून काढलं. त्यांनी सांगितलं की बिग बॉस १७ मध्ये मुनव्वर फारुकीची माजी पार्टनर आयशा खान आली होती, पण तो शोचा ठरवलेला भाग नव्हता. त्या वेळी चालू असलेल्या एका बातमीच्या पार्श्वभूमीवर ती घरात आली होती. त्याशिवाय इतर कोणत्याही सीजनमध्ये अशी योजना नव्हती.

नेगी म्हणाले की शोचं उद्दिष्ट केवळ वाद निर्माण करणं नाही, तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एका छताखाली आणून त्यांचा परस्पर संवाद प्रेक्षकांसमोर मांडणं हे आहे. त्यातूनच मनोरंजन तयार होतं. त्यामुळे शोला स्क्रिप्टेड म्हणणं योग्य नाही, कारण सगळं काही थेट त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि परिस्थितींवर अवलंबून असतं.

किती वाजता बघायला मिळतो Bigg Boss

सध्या ‘बिग बॉस १९’ जिओ हॉटस्टारवर रात्री ९ वाजता पाहता येतो, तर कलर्स टीव्हीवर हा शो रात्री १०.३० वाजता प्रसारित होतो. या सिझनमध्येही नव्या चेहऱ्यांसोबत नव्या नात्यांच्या आणि भावनांच्या कहाण्या रंगताना दिसत आहेत, आणि त्याचमुळे ‘बिग बॉस’ प्रेक्षकांसाठी वर्षानुवर्षे आकर्षण ठरत आहे.

ताज्या बातम्या