बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या (Bollywood Celebrities) घराबाहेर गोळीबार होणे आता दुर्दैवाने एक सामान्य बाब झाली आहे. सलमान खान, सैफ अली खान, दिशा पटाणी आणि अगदी कॉमेडियन कपिल शर्मा यांच्याही घराबाहेर फायरिंगच्या घटना समोर आल्या आहेत. यामागे मोठ्या गुन्हेगारी गटांचा हात असून, हे गँगस्टर्स उघडपणे या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत आहेत. त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. बॉलिवूडमधील हे स्टार्स खरंच किती सुरक्षित आहेत?
दिशा पटाणीच्या घराबाहेर फायरिंग, गोल्डी बरारने घेतली जबाबदारी
नुकतंच दिशा पटाणीच्या राहत्या घराबाहेर रात्रीच्या वेळेस काही अज्ञात बाइकस्वारांनी सुमारे ७ राऊंड फायरिंग केलं. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी बरार गँगने घेतली आहे. कथित माहितीप्रमाणे, दिशाच्या बहिणीने एका वादग्रस्त धार्मिक विधानावर प्रतिक्रिया दिली होती, ज्यावरून हे प्रकरण उद्भवले. मात्र, दिशाच्या वडिलांनी नंतर स्पष्ट केलं की त्यांच्या मुलीच्या विधानाचा अर्थ चुकीचा लावण्यात आला आहे.

सलमान खान कायम टार्गेटवर (Bollywood Celebrities)
एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर देखील अशाच पद्धतीने फायरिंग करण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली होती. सलमानला याआधीही अनेक वेळा जीवघेण्या धमक्या मिळाल्या आहेत, आणि त्याच्या सुरक्षेसाठी सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सैफ अली खानवर घरात घुसून हल्ला
बॉलिवूडचा ‘नवाब’ सैफ अली खान याच्या घरात घुसून थेट चाकूने हल्ला करण्यात आला होता. घराच्या आतपर्यंत पोहोचणाऱ्या हल्लेखोरांमुळे सेलेब्रिटींच्या सिक्योरिटी व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
कपिल शर्मा: देशाबाहेरही सुरक्षितता धोक्यात
ऑगस्ट 2025 मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार झाला. परदेशातही सेलिब्रिटींवर हल्ले होत असतील, तर याचा अर्थ त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही.
एल्विश यादवसारखे युट्यूब स्टार्सही गँगस्टर्सच्या निशाण्यावर
केवळ चित्रपटसृष्टीतील कलाकारच नाही, तर सोशल मीडिया इन्फ्लुएंसरही गँगस्टर्सच्या रडारवर आहेत. ऑगस्ट महिन्यात युट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादवच्या घराबाहेरही फायरिंग झाली. त्यावेळी एल्विश घरी नसला तरी त्याचे पालक या घटनेमुळे मानसिक धक्क्यात गेले.
हा गुन्हेगारीचा नविन ट्रेंड?
गँगस्टर्स लॉरेंस बिश्नोई, गोल्डी बरार, रोहित गोदारा हे सर्रास धमक्या देत आहेत, सोशल मीडियावर हल्ल्यांची जबाबदारी घेत आहेत. सेलिब्रिटींच्या घराबाहेर (Bollywood Celebrities) थेट गोळीबार, घरात घुसून चाकूने हल्ले हे सर्व प्रकार पाहता, प्रश्न उपस्थित होतो की, बॉलिवूडमधील कलाकार स्वत:च्या घरातही कितपत सुरक्षित आहेत? ही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली दहशत आहे की यामागे मोठं रॅकेट कार्यरत आहे? पोलिस प्रशासन, गुप्तचर विभाग आणि केंद्र सरकार यांना याबाबत काय ठोस पावलं उचलायची आहेत?
बॉडीगार्ड, CCTV आणि हाय सिक्योरिटी असूनही बॉलिवूड सेलेब्सवर जीवघेणी टांगती तलवार का आहे? जर नामांकित आणि धनाढ्य कलाकार सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचं काय? हे प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहेत. वेळ आली आहे की सुरक्षा व्यवस्थेवर फक्त भरोसा न ठेवता, या गुन्हेगारी गँग्सवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा “स्टार” असणं हेच एक धोका ठरेल.











