कोकणातील पारंपरिक लोककला, अध्यात्म आणि गूढतेचा संगम असलेला ‘दशावतार’ (Dashavatar Marathi Movie) हा नवा मराठी चित्रपट उद्या (१२ सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची यात प्रमुख भूमिका असून, त्यांनी साकारलेला गूढ अवतार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कथानक आणि दिग्दर्शन
‘दशावतार’ हा चित्रपट एक रहस्यमय आणि थरारक प्रवास आहे, जो कोकणातील पारंपरिक कला व तत्त्वज्ञानाशी जोडलेला आहे. चित्रपटाचे लेखन, पटकथा आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून, निर्मिती ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसच्या संयुक्त विद्यमाने झाली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी सलग ५० दिवस करण्यात आले आहे.

कलाकारांची तगडी फौज (Dashavatar Marathi Movie)
या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव,सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, आणि अभिनय बेर्डे यांसारखे लोकप्रिय चेहरे दिसणार आहेत. दिलीप प्रभावळकर यांची भूमिका विशेषतः गूढ आणि आध्यात्मिक स्वरूपाची असून, त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्येच दिसून येते.
संगीत आणि गाणी
चित्रपटाचे संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे असून, गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. आतापर्यंत प्रसिद्ध झालेली दोन गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. (Dashavatar Marathi Movie)
‘ऋतुचक्र’ -एक मनमोहक प्रेमगीत, प्रियदर्शिनी इंदलकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्या वर चित्रीत.
‘आवशीचो घो’- कोकणी मातीत रुजलेलं, वडील-पुत्राच्या नात्यावरील भावनिक गाणं.
ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
दशावतारचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. ट्रेलरमध्ये कोकणातील लोककला, गूढ प्रथा, अध्यात्मिक रहस्यं आणि थरार यांचा प्रभावी मिलाफ दिसून येतो. पार्श्वसंगीत, रंगसंगती आणि संवाद यामुळे प्रेक्षकांना ‘दशावतार’कडे विशेष आकर्षण वाटू लागलं आहे.
ट्रेलर लॉन्चप्रसंगी दिलीप प्रभावळकर म्हणाले “दशावतार हा एक वेगळाच अनुभव होता. ही भूमिका माझ्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कोकणातील परंपरा आणि गूढता यात गुंतलेलं कथानक साकारताना फारच आव्हानात्म वाटलं.
प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
कोकणातील लोककलेवर आधारित थरारक कथा पहिल्यांदाच मोठ्या स्वरूपात मराठी चित्रपटात साकारण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या आगमनाची प्रतीक्षा ग्रामीण व नागरी प्रेक्षक दोघंही करत आहेत.
दरम्यान, ‘दशावतार’ १२ सप्टेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, हा चित्रपट पारंपरिक कथा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम मेळ साधणारा ठरण्याची शक्यता आहे. मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या परंपरेशी जोडलेले, गूढ आणि सांस्कृतिक चित्रपट फारच कमी पाहायला मिळतात. ‘दशावतार’ याबाबतीत एक वेगळा मार्ग चोखाळत असल्याने त्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त आहेत.











