बॉलीवूड आणि साउथ इंडस्ट्री दोन्हीकडे चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकार धनुष आणि कृति सेनन सध्या त्यांच्या नवीन चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या चर्चेत आहेत. ‘तेरे इश्क में’ या रोमँटिक ड्रामाने रिलीज झाल्यानंतर केवळ दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर प्रचंड जोरदार ओपनिंग घेतली आहे. लाखोंनी थिएटरची तिकीटं काढत चित्रपट पाहण्याचा धडाका सुरू केला आहे. याच वातावरणात आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये धनुषने दाखवलेली सज्जनता आणि जबाबदार वागणूक पाहून लोक त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये नुकतीच ‘तेरे इश्क में’ची खास स्क्रीनिंग पार पडली. चित्रपटाची फेम वाढलेली असल्याने आणि धनुष-कृतिच्या जोडीबद्दलची उत्सुकता वाढल्याने थिएटरच्या बाहेर प्रचंड गर्दी उसळली. चाहत्यांनी दोन्ही कलाकारांना पाहण्यासाठी मोठी रेलचेल केली. त्या धांदलीत कृति सेनन क्षणभर गोंधळून गेल्याचे दिसून आले. गर्दी वाढत जात असल्याने तिच्याकडे चाहत्यांचा ओघ आणखी वाढू लागला आणि काही क्षणांसाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

धनुषने उचलले हिरो सारखं पाऊल
याच वेळी धनुषने खऱ्या अर्थाने ‘हीरो’सारखे पाऊल उचलले. त्याने तत्काळ कृतिजवळ उभं राहून तिला आपल्याकडे घेतले आणि हातांनी संरक्षण देत तिला सावधपणे मार्ग करून कारपर्यंत पोहोचवलं. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या प्रसंगात धनुष अगदी शांततेने, कुठलीही घाई न करता, तिचे रक्षण करत असल्याचे स्पष्ट दिसते. हा छोटासा पण प्रभावी हावभाव पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर धनुषचं प्रचंड कौतुक सुरू केलं आहे. “जेन्टलमन धनुष”, “रिअल लाइफ हिरो”, “हीरोइक अॅक्शन”, अशा कमेंट्सची भरती चालू आहे. काही नेटिझन्सनी तर लिहिले आहे, “वागणूक पाहून कलाकाराचं खरे व्यक्तिमत्व ओळखता येतं.”
तेरे इश्क मैं मध्ये काय खास
दरम्यान, आनंद एल. राय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में’च्या यशाला चाहत्यांचा मोठा हातभार लागत आहे. चित्रपटात धनुष आणि कृति सेननची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. कथेमधील भावनिक क्षण, आकर्षक गाणी आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडताना समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. रिलीजच्या दोन दिवसांत चित्रपटाने तब्बल ३३ कोटींची कमाई केली असून हा आकडा पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
स्क्रीनिंगला चाहत्यांची प्रचंड गर्दी, बॉक्स ऑफिसवरील यश, आणि आता व्हायरल होत असलेला ‘धनुषने केलेलं संरक्षण’ हा व्हिडिओ या सर्वामुळे ‘तेरे इश्क में’ सध्या सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांच्या चर्चेत जोरदारपणे वर्चस्व गाजवत आहे. धनुष आणि कृतिच्या या जोडीने केवळ सिनेमातच नव्हे तर वास्तविक जीवनातही चाहत्यांची मने जिंकली आहेत.











