Dhurandhar Movie : भारतात सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालणारा आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवणारा ‘धुरंदर’ सिनेमा आता आंतरराष्ट्रीय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. देशभरात या सिनेमाची चर्चा असताना आणि कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित होत असताना, आखाती देशांतील सहा राष्ट्रांनी या चित्रपटावर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
‘उरी’सारखा देशभक्तीचा सिनेमा देणारे दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंदर’ हा सिनेमा भारतीय सैन्य दलाच्या धाडसी मोहिमेवर आधारित आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण पार्श्वभूमी, गुप्तहेरांची कारवाई आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा या सिनेमाच्या कथेत ठळकपणे मांडण्यात आला आहे. याच कारणामुळे हा सिनेमा पाकिस्तानविरोधी नॅरेटिव्ह पसरवतो, असा आरोप करत आखाती देशांच्या सेन्सॉर बोर्डांनी ‘धुरंदर’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
तब्बल 218 कोटींची कमाई (Dhurandhar Movie)
या सिनेमाने अवघ्या आठवड्याभरात तब्बल 218 कोटींची कमाई करत 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. भारतात प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये गर्दी करत असून सोशल मीडियावर सिनेमातील दृश्ये, संवाद आणि गाणी तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे अनेक रिल्स आणि व्हिडिओंमुळे सिनेमाची लोकप्रियता आणखी वाढताना दिसते आहे.
आखाती देशांमध्ये यापूर्वी अनेक बॉलिवूड चित्रपटांनी मोठी कमाई केली आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ सिनेमा आखातीतून 147 कोटींची कमाई करतो, तर ‘पठाण’ने 118 कोटी, ‘बजरंगी भाईजान’ने 79 कोटी, ‘दंगल’ने 74 कोटी आणि ‘सुलतान’ने 72 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि आखाती देशांमधील व्यावसायिक नाते नेहमीच मजबूत राहिले आहे. अशा परिस्थितीत ‘धुरंदर’वर घातलेली बंदी अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरते आहे.
मात्र चित्रपट व्यापारातील जाणकारांच्या मते, ‘धुरंदर’च्या निर्मात्यांना सुरुवातीपासूनच अशा अडचणींचा अंदाज होता. त्यामुळे आखाती देशांतील कमाई गृहित न धरता त्यांनी इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले होते. परिणामी या बंदीचा फारसा फटका सिनेमाच्या एकूण कमाईवर बसणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उलट वादामुळे सिनेमाची प्रसिद्धी अधिक वाढली असून भारतात प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढताना दिसते आहे.
या सिनेमात रणवीर सिंगने साकारलेली भूमिका प्रभावी असली, तरी सर्वाधिक चर्चेत आहे ती अक्षय खन्नाची भूमिका. रहमान डकैत या खलनायकाच्या भूमिकेत अक्षय खन्नाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले आहे. त्याचा शांत पण धोकादायक अॅटिट्यूड, धारदार संवाद आणि दमदार अभिनय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नायक म्हणून मिळालेलं यश नाही, ते खलनायक म्हणून अक्षय खन्नाला मिळत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. Dhurandhar Movie
कोणकोणत्या देशांत बंदी
सध्या ‘धुरंदर’वर बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई या सहा आखाती देशांनी बंदी घातली आहे. मात्र भारतात या सिनेमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. येत्या काही दिवसांत हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा सहज पार करेल, असा विश्वास सिनेसमीक्षक व्यक्त करत आहेत.
एकूणच, आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे परदेशात अडथळे निर्माण झाले असले तरी भारतात ‘धुरंदर’ची घोडदौड थांबण्याची चिन्हे नाहीत. उलट या वादामुळेच सिनेमाची चर्चा अधिक रंगली असून, प्रेक्षकांचा ओघ वाढताना दिसत आहे. त्यामुळे आखाती देशांनी बंदी घातली असली तरी ‘धुरंदर’ची जादू कमी होणार नाही, तर ती अधिकच गडद होत जाणार आहे, हे मात्र नक्की.





