Dhurandhar Movie : रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित स्पाय अॅक्शन ड्रामा ‘धुरंधर’ने रिलीज होण्याच्या आधीच बॉक्स ऑफिसवर गाजावाजा निर्माण केला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या भव्य चित्रपटाने राष्ट्रीय मल्टिप्लेक्स साखळ्या PVR Inox आणि Cinepolisमध्ये पहिल्या दिवशीच्या शोकरिता तब्बल 25 हजारांहून अधिक तिकीटांची विक्री पूर्ण केली आहे. यामध्ये PVR Inox कडून एकट्याने सुमारे 21,500 तिकीटांची नोंद झाली असून उर्वरित तिकीटे Cinepolisमध्ये विकली गेल्याचे समजते.
अजून वाढणार तिकीट विक्रीचा वेग (Dhurandhar Movie)
चित्रपटाच्या ग्रँड रिलीजला अजून चार दिवस बाकी आहेत. तरीही ‘धुरंधर’ची प्री-बुकिंग गती पाहता आगामी काळात ही संख्या सहजपणे एक लाखांच्या पुढे जाईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अंतिम आकडेवारी सुमारे 1.25 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चित्रपटाची चालू गती कायम राहिली तर या अंदाजाला नक्कीच अधिक जोर मिळण्याची शक्यता आहे.

रणवीरसाठी यशाची मोठी संधी
‘धुरंधर’ हा या वर्षातील हिंदी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. रणवीर सिंगसाठीदेखील हा चित्रपट निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत, कारण त्याच्या मागील काही चित्रपटांनी अपेक्षित यश मिळवले नव्हते. त्यामुळे या स्पाय अॅक्शन ड्रामाकडून प्रेक्षकांसोबतच निर्मात्यांनाही मोठ्या अपेक्षा आहेत. रणवीर मोठ्या पडद्यावर जोरदार पुनरागमन करतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मोठ्या बजेटचा चित्रपट, मजबूत ओपनिंगची गरज
‘धुरंधर’ हा मोठ्या खर्चावर उभारलेला प्रकल्प आहे. त्यामुळे चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच दमदार ओपनिंग मिळवणे अत्यावश्यक आहे. अंतिम दिवसांत तिकीट बुकिंगची वाढ आणि नंतर B व C सेंटरमध्ये होणारी विक्री या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर मोठा प्रभाव टाकणार आहे. सध्या सुरू असलेली प्री-बुकिंगची गती मात्र निर्मात्यांसाठी सकारात्मक संकेत देत आहे.
दमदार स्टारकास्ट
या चित्रपटात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि सारा अर्जुन यांसारखे अनुभवी आणि दमदार कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे चित्रपटाची स्टारवॅल्यू अधिक वाढली आहे. ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक आपली तिकीटे ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवरून किंवा जवळच्या थिएटर काउंटरवरून सहज घेऊ शकतात.











