खलिस्तानी समर्थकांच्या निशाण्यावर दिलजीत दोसांझ! पन्नूच्या धमकीनंतर शोमध्ये लागले ‘खालिस्तान जिंदाबाद’चे नारे

दिलजीत सध्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत आणि विविध देशांमध्ये कार्यक्रम सादर करत आहेत. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे झालेल्या एका शोदरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी प्रेक्षकांमध्ये घुसून मंचाजवळ ‘खालिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांच्या निशाण्यावर आले आहेत. ऑस्ट्रेलियातील त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान काही अराजक तत्वांनी ‘खालिस्तान जिंदाबाद’चे नारे देत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर दिलजीत यांच्या न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे होणाऱ्या आगामी शोला देखील खलिस्तानी समर्थकांनी थांबवण्याची धमकी दिली आहे.

हा वाद त्या वेळी पेटला, जेव्हा दिलजीत दोसांझ अलीकडेच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोड़पति’या कार्यक्रमात पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान दिलजीत यांनी बिग बींचे पाय धरून त्यांचे आशीर्वाद घेतले. याच कृतीवरून खलिस्तानी समर्थक संतप्त झाले आहेत.

ऑस्ट्रेलियातील शोदरम्यान नारेबाजी

दिलजीत सध्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत आणि विविध देशांमध्ये कार्यक्रम सादर करत आहेत. ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे झालेल्या एका शोदरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी प्रेक्षकांमध्ये घुसून मंचाजवळ ‘खालिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले. तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तरीदेखील दिलजीत दोसांझ यांनी आपली परफॉर्मन्स न थांबवता शो पूर्ण केला.

पुन्हा मिळाली धमकी

माध्यमांच्या माहितीनुसार, खलिस्तानी समर्थकांनी दिलजीत दोसांझ यांच्या ऑकलंड (न्यूझीलंड) येथील पुढील कार्यक्रमाला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. प्रतिबंधित संघटना सिख्स फॉर जस्टिस (SFJ)चा प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने दिलजीत यांचे कार्यक्रम परदेशात होऊ नयेत, असे आवाहन केले आहे.

दिलजीतचा शांत प्रतिसाद

दरम्यान, दिलजीत दोसांझ यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया टूरमधील काही खास छायाचित्रे आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. अॅडलेडमधील चाहत्यांसाठी दिलजीत यांनी एक खास पोस्टही शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, “कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि संयम राखा, तणाव घेऊ नका.”

खलिस्तानी समर्थक का आहेत नाराज?

खलिस्तानी संघटना सिख्स फॉर जस्टिस आणि गुरपतवंत पन्नू यांच्या मते, १९८४ मधील सिख दंगलीदरम्यान अमिताभ बच्चन यांनी लोकांना भडकावले होते. पन्नूचा आरोप आहे की, “ज्यांच्या शब्दांमुळे हजारो सिख मारले गेले, अशा व्यक्तींचे पाय धरून दिलजीत दोसांझ यांनी त्या नरसंहारातील प्रत्येक पीडित, विधवा आणि अनाथाचा अपमान केला आहे.”

वाद आणि धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही दिलजीत दोसांझ शांतपणे आपल्या कलाकृती आणि चाहत्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर “लव्ह अँड पीस”चा संदेश देत गायकाचा पाठिंबा दर्शवला आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News