Disha Patani House Firing : दिशा पाटनीच्या घरी गोळीबार का केला?? कुख्यात गँगस्टर कडून मोठा खुलासा

घटनेनंतर काही तासांतच सोशल मीडियावर गोल्डी बरार गटाशी संबंधित असलेल्या एका फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्या उत्तर प्रदेशातील बरेली शहरातील घराजवळ मध्यरात्री गोळीबार (Disha Patani House Firing) झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. या घटनेची जबाबदारी कॅनडा-स्थित कुख्यात गँगस्टर गोल्डी बरार आणि त्याचा साथीदार रोहित गोदारा यांनी सोशल मीडियावरून घेतली असून, त्यांनी दावा केला आहे की हा हल्ला दिशाची बहीण खुशबू पाटनी हिने हिंदू संतांबद्दल केलेल्या वक्तव्याचा ‘बदला’ म्हणून करण्यात आला.

हल्ल्याचा थरारक प्रसंग- Disha Patani House Firing

गुरुवारी पहाटे सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास, दोन बाईकस्वार अज्ञात हल्लेखोरांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील दिशाच्या वडिलांचे घर, जेथे रिटायर्ड डिप्टी एसपी जगदीश पाटनी वास्तव्यास आहेत, त्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आणि भिंतीवर चार ते पाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घराच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणेत खळबळ

या गंभीर घटनेनंतर बरेली पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या असून, एसपी सिटी आणि एसपी क्राईम यांच्या नेतृत्वाखाली पाच विशेष तपास पथकं तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन्स, आणि सायबर पुरावे यावर आधारित तपास सध्या प्रगतीपथावर आहे. Disha Patani House Firing

गोल्डी बरार आणि रोहित गोदारा यांची धमकीपूर्ण पोस्ट

घटनेनंतर काही तासांतच सोशल मीडियावर गोल्डी बरार गटाशी संबंधित असलेल्या एका फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून खालीलप्रमाणे धमकी देण्यात आली आहे. “भाइयों, आज खुशबू पाटनी/दिशा पाटनी के घर पर जो फायरिंग हुई है, वो कार्रवाई है। इसने हमारे पूज्य संत प्रेमानंद महाराज और अनिरुद्धाचार्य का अपमान किया है। यह ट्रेलर है, अगली बार किसी को भी जिंदा नहीं छोड़ेंगे जो हमारे धर्म और संतों का अपमान करेगा।” Disha Patani House Firing

या पोस्टमध्ये सनातन धर्म, संतांचे महत्त्व, आणि धार्मिक श्रद्धेची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला. ही पोस्ट सध्या डिलीट करण्यात आली असली तरी तिचे स्क्रीनशॉट पोलिसांकडे तपासासाठी उपलब्ध आहेत.

विवादाचे मूळ: खुशबू पाटनीचा संतांवरील व्हिडीओ

या हल्ल्याचा संदर्भ काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका वादग्रस्त व्हिडिओशी आहे. खुशबू पाटनी हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात ती अनिरुद्धाचार्य नावाच्या कथावाचकावर टीका करत होती. अनिरुद्धाचार्य यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांबद्दल केलेल्या टिप्पणीवरून खुशबू पाटनी संतापली होती आणि त्यांनी त्या वक्तव्याचा निषेध करत व्हिडीओ केला होता.

मात्र काही माध्यमांनी असा दावा केला की ती टीका प्रेमानंद महाराजांविरोधात होती. यावर खुशबूने स्पष्टीकरण दिलं की, तिची नाराजी केवळ अनिरुद्धाचार्य यांच्याशी संबंधित होती, प्रेमानंद महाराज यांच्याविरोधात नव्हे. पण हे प्रकरण पुढे गाजत गेलं आणि गँगस्टर टोळ्यांनी यात हस्तक्षेप करत हल्ला केला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोल्डी बरार कोण आहे?

गोल्डी बरार, मूळचा पंजाबमधील असून, सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे. तो अनेक खून, खंडणी आणि अन्य गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉंटेड आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणूनही त्याचे नाव समोर आले होते. त्याचा गट भारतातील अनेक राज्यांमध्ये गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे.

सुरक्षेचा प्रश्न आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संघर्ष

ही घटना केवळ एका अभिनेत्रीच्या घरावर हल्ला यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आता हा मुद्दा धार्मिक भावना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गुन्हेगारी टोळ्यांचा हस्तक्षेप, आणि सामाजिक सलोखा यांच्याशी संबंधित आहे. दिशा पाटनी किंवा तिच्या कुटुंबीयांनी यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, देशभरातून या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News