Eknath Shinde : मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
नागरिकांना तातडीने मदत करा
यावेळी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफ च्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले.

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा
दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आज काही जिल्ह्यातील शाळा काँलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळं अनेक लोकांचा संसार उद्वस्त झाला आहे. त्यामुळं सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा, तसेच वेळोवेळी पूरपरिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत.