मराठी सिनेसृष्टीतील ‘हिट जोडी’; कलर्स मराठीवरील मालिकेत एकत्र!

१८ - २० वर्षांनी मराठी प्रेक्षकांची आवडती जोडी पुन्हा एकत्र! मोठ्या पडद्यावर गाजलेली ही जोडी आता छोट्या पडद्यावर करणार धमाल!

अनेक सदाबहार चित्रपटांतून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर ही जोडी तब्बल १८–२० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

‘अशोक मा.मा.’ मालिकेत एकत्र झळकणार

कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ मालिकेत लवकरच मंगळागौरीचा विशेष भाग दाखवला जाणार आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिकेत आता अशोक मामा आपल्या सुनेची म्हणजेच भैरवीची पहिली मंगळागौर साजरा करण्याचा घाट घालणार आहेत. सध्या मालिकेत अनिश आणि भैरवीचं लग्न पार पडलं असून आता भैरवीची पहिली मंगळागौर मोठ्या उत्साहात अशोक मामा साजरी करणार आहेत. या खास भागात वर्षा उसगांवकर सहभागी होणार आहेत. या ज्येष्ठ अभिनेत्रीसह कलर्स मराठीवरील इतर मालिकांतील नायिकादेखील सहभागी होणार आहेत. ‘अशोक मा.मा.’ मालिकेचा हा मंगळागौर विशेष भाग ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

वर्षा उसगांवकर म्हणाल्या

या निमित्ताने बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “कलर्स मराठी माझ्यासाठी खूप लकी आहे. बिग बॉस मराठीमधून मी प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि आता ‘अशोक मा.मा.’ मध्ये काम करत आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे मी आणि अशोक सराफ छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहोत. आम्ही दोघांनी मोठा पडदा तर गाजवला आहेच आणि आता छोटा पडदा देखील गाजवायला सज्ज आहोत. मला असं वाटतं की मी आणि अशोक सराफ हे तब्बल १८ – २० वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. अशोक सराफ एक महानट आहेत. कारण त्यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला नेहमीच काहीतरी नवीन सापडलं आहे. त्याच्यासोबत काम करताना मी स्वतःला सापडत गेले, असं त्या म्हणाल्या. मालिकेत या दोघांना पुन्हा एकत्र काम करताना बघायला मिळणं म्हणजे सुवर्णसंधी आहे.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News