बॉलिवूडमधील गुणी अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई हेमवंती देवी यांचं 89 व्या वर्षी निधन झालं आहे. पंकज त्रिपाठी यांच्या कडून जारी केलेल्या निवेदनाद्वारे ही दु:खद बातमी समोर आली आहे. या कठीण क्षणी पंकज त्रिपाठी स्वतः आईसोबत उपस्थित होते. त्यांच्या आईचं अंत्यसंस्कार शनिवारी बेलसंड येथे कुटुंबीय, नातेवाईक आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडले. त्रिपाठी कुटुंब सध्या या शोकात बुडालं आहे.
त्रिपाठी कुटुंब शोक सागरात बुडाले !
त्रिपाठी कुटुंबानं एका निवेदनात म्हटलं आहे की, ‘श्रीमती हेमवंती देवी यांच्या निधनाची घोषणा करताना आम्हाला खूप दुःख होत आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या आणि काही महिन्यांपासून आजारी होत्या. पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत होते.’ या दुःखाच्या काळात कुटुंबाने प्रायव्हसीचं आवाहन केलं आहे आणि सर्वांना विनंती केली आहे की, त्यांनी श्रीमती हेमवंती देवींसाठी प्रार्थना करावी. जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, “आम्हाला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की श्री पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय माता श्रीमती हेमवंती देवी यांचं शुक्रवारी बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड येथील त्यांच्या राहत्या घरी शांतपणे निधन झालं. त्या काही काळापासून आजारी होत्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत, आपल्या खाटेवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.”

पंकजच्या वडीलांचे 2 वर्षांपूर्वीच निधन
यापूर्वी, अभिनेत्याचे वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचं २१ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांच्या वडिलोपार्जित गावात निधन झालं. त्यावेळी पंकज त्रिपाठी मुंबईत ‘ओएमजी २’ चं प्रमोशन करत होते आणि ही बातमी मिळताच ते अंत्यसंस्कारासाठी लगेच बिहारला गेले. पंकज त्रिपाठींच्या यशात त्यांच्या वडीलांची मोठी भूमिका होती. पटना येथे कॉलेज थिएटरमध्ये अभिनयाची आवड निर्माण होण्यापूर्वी, पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या पुजारी आणि शेतकरी वडिलांना घरी मदत केली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून पदवी घेतल्यानंतर, ते मुंबईत आले. येथे त्यांनी अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.











