Ghanshyam Darode : बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला ‘छोटा पुढारी’ उर्फ घनश्याम दरोडे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा जिवलग मित्र आणि बिग बॉस मराठीतील सहकारी सूरज चव्हाणच्या लग्नाला घनश्याम गैरहजर राहिला. यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, या सगळ्याच गोंधळात भर घातली ती घनश्यामने शेअर केलेल्या एका व्हिडीओने.
घनश्यामने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची आई त्याच्या अंगाला हळद लावताना दिसत होती. त्यानंतर तो एका दुकानात जाऊन लग्नाचे कपडे खरेदी करत असल्याचे दृश्यही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. हा व्हिडीओ पाहताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आणि “छोटा पुढारी लग्न करतोय का?”, “वहिनी कोण आहे?”, “लग्नाची तारीख कधी?” असे असंख्य प्रश्न सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. काहींनी तर फोन करूनही थेट चौकशी सुरू केली.
घनश्यामने शेअर नवा व्हिडिओ (Ghanshyam Darode)
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर घनश्यामवर प्रश्नांचा अक्षरशः भडिमार झाला. अखेर या सगळ्या चर्चांना उत्तर देण्यासाठी घनश्यामने आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो हात जोडून शांतपणे बोलताना दिसतो. तो सांगतो की, काही दिवसांपूर्वी शेअर केलेला हळदीचा व्हिडीओ हा त्याच्या वैयक्तिक लग्नाशी संबंधित नव्हताच. तो फक्त एका प्रमोशनल व्हिडीओचा भाग होता, अशी स्पष्ट कबुली त्याने दिली.
या व्हिडीओमध्ये घनश्याम पुढे म्हणतो की, त्या हळदीच्या व्हिडीओनंतर आलेल्या कमेंट्स, फोन कॉल्स आणि मेसेजेसमुळे तो खूप हैराण झाला होता. लोकांनी कोणतीही खात्री न करता थेट त्याचं लग्न ठरल्याच्या अफवा पसरवल्या, यामुळे त्याला स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं. सध्या तो अजून पूर्णपणे सेटल झालेला नसून, आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याचंही त्याने सांगितलं.Ghanshyam Darode
लग्नाबाबत मोठा खुलासा
लग्नाबाबत बोलताना छोटा पुढारी म्हणतो की, तो सध्या लग्नासाठी मुलगी शोधत आहे. मात्र, त्याच्या अपेक्षा खूप साध्या आहेत. स्वभावाने चांगली, समजूतदार आणि कुटुंब सांभाळणारी मुलगी असावी, अशी त्याची इच्छा आहे. मात्र, अशी योग्य जोडीदार अजून त्याला सापडलेली नाही. त्याचं लग्न पूर्णपणे आई-वडिलांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या निर्णयावर होणार असल्याचंही तो ठामपणे सांगतो.
व्हिडीओच्या शेवटी घनश्यामने आपल्या चाहत्यांना आणि सोशल मीडियावरील लोकांना खास विनंती केली. योग्य वेळ आल्यावर तो स्वतः लग्नाबाबत माहिती देईल आणि नक्कीच सर्वांसाठी “वहिनी” घेऊन येईल, असं आश्वासनही त्याने दिलं. मात्र, तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि “घनश्यामचं लग्न जमलं”, “छोटा पुढारी बोहल्यावर चढला” अशा बातम्या पसरवू नयेत, असं आवाहन करत त्याने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.





