मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री गिरिजा ओक (Girija Oak) गोडबोले सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि X (पूर्वीचं ट्विटर) वर तिचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत ती निळ्या साडीमध्ये दिसत असून, तिच्या सौंदर्याने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने नेटिझन्सना अक्षरशः वेड लावलं आहे. या व्हायरल पोस्टनंतर अनेकांनी तिची तुलना हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वीनी आणि इटालियन अभिनेत्री-मॉडेल मोनिका बेलुची यांच्याशी करत, गिरिजा ओकला “भारताचा उत्तर” असं संबोधलं आहे.
फोटोमुळे इंटरनेटवर हवा (Girija Oak)
गिरिजा ओक गोडबोले ही मराठी आणि हिंदी या दोन्ही माध्यमांमध्ये गेली जवळपास दोन दशके काम करत आहे. ‘शोर इन द सिटी’, ‘ताईची शाळा’, ‘तळ्यात मळ्यात’, ‘माई वाइफ्स मर्डर’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपली अभिनयकौशल्यं दाखवली आहेत. तसेच, ‘गाव थोर पुडारी चोर’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘तुझं माझं जमतंय’ यांसारख्या लोकप्रिय मराठी कार्यक्रमांमधूनही ती घराघरात पोहोचली आहे. पण या वेळेस गिरिजा तिच्या कामामुळे नव्हे, तर एका साध्या फोटोमुळे संपूर्ण इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे.

काय म्हणाली गिरिजा
या अचानक वाढलेल्या प्रसिद्धीबाबत बोलताना गिरिजा (Girija Oak) म्हणाली की, “मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले आहे. रविवारी संध्याकाळी माझा फोन सतत वाजत होता. मी नाटकाच्या रिहर्सलमध्ये व्यस्त असल्याने कॉल्स उचलू शकत नव्हते. पण मित्रांचे सतत मेसेज येत होते ‘तुला माहीत आहे का X वर काय चाललं आहे?’ मग पाहिलं तर माझ्या निळ्या साडीतील फोटोंवर लोक वेड्यासारखी चर्चा करत होते.”
तिने पुढे सांगितलं, “एका पोस्टमध्ये लोक वाद घालत होते की हा फोटो प्रिया बापटचा आहे की माझा! नंतर माझ्या देवरानं सांगितलं की काही सोशल मीडिया अकाउंट्स माझे फोटो वापरून ‘भाभी प्रेमी’ प्रकारचं कंटेंट तयार करत आहेत. काहींनी माझ्या फोटोंना कामुक रूप दिलं, पण माझ्या मराठी चाहत्यांनी मात्र अभिमानाने प्रतिसाद दिला ‘तुम्ही तिला आता शोधली आहे, आम्ही तिला वर्षानुवर्षांपासून ओळखतो!’”
गिरिजा या सर्व घडामोडीकडे अतिशय शांतपणे पाहते. ती म्हणते, “मी जे करते ते माझं खरं ओळख आहे. जर लोक आता माझं काम पाहत असतील आणि ओळखत असतील, तर मला त्यात आनंद आहे. सोशल मीडियावर काय व्हायरल होतं, यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. तिने हेही सांगितलं की या चर्चेमुळे तिच्या कुटुंबाला काहीही अस्वस्थता वाटली नाही. “सुदैवाने मी फिल्मी घरातून आले आहे. माझे वडील अभिनेता आहेत, माझे सासरे निर्माते आहेत आणि माझे पती दिग्दर्शक आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबाला या गोष्टींचं भान आहे. लोक काय बोलतात, कसं बघतात, हे आपण नियंत्रित करू शकत नाही. जर तुम्ही स्वतःला उंच स्थानी ठेवता, तर लोक बोलणारच हे आम्ही मान्य केलं आहे,” ती हसत म्हणाली.
गिरिजा ओक गोडबोले ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक गंभीर, समजूतदार आणि प्रतिभावान अभिनेत्री मानली जाते. तिचं व्यक्तिमत्त्व सौंदर्य आणि आत्मविश्वास यांचं उत्तम मिश्रण आहे. एका साध्या निळ्या साडीतील फोटोमुळे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अभिनेत्रींसोबत तुलना केली जात आहे, ही गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी अभिमानाचीच आहे. सध्या सोशल मीडियावर “नीळी साडीवाली गर्ल” म्हणून ओळखली जाणारी गिरिजा या प्रसिद्धीचा आनंद घेत आहे. ती म्हणते, “लोक माझ्या अभिनयाकडे पुन्हा पाहत आहेत, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं कौतुक आहे. मराठी चाहत्यांसाठी ही केवळ एक व्हायरल ट्रेंडची बातमी नाही, तर आपल्या सिनेसृष्टीतील एका गुणवंत अभिनेत्रीच्या जागतिक स्तरावर ओळखीचा क्षण आहे.











