Govardhan Asrani Funeral : असरानी यांच्यावर शांततेत अंत्यसंस्कार का झाले? समोर आलं मोठं कारण

Asavari Khedekar Burumbadkar

दिवाळीच्या सणात संपूर्ण देश उजळलेला असतानाच, हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रकाशमान तारा कायमचा निखळला. “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” या आपल्या अविस्मरणीय संवादाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार गोवर्धन असरानी यांचं 20 ऑक्टोबर रोजी निधन (Govardhan Asrani Funeral) झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्याच रात्री त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. यामुळे अनेकांना धक्का बसला, तर चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. विशेषतः अंत्यसंस्कार इतक्या गुप्तपणे आणि घाईघाईत का झाले?

आरोग्य बिघडलं, पण…

असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी स्पष्ट केलं की, गेल्या काही आठवड्यांपासून असरानी यांची प्रकृती खालावत होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीत त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरल्याचं समोर आलं. याच आजारामुळे 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान त्यांचं निधन झालं.

अंत्यसंस्कार गुप्तपणे का? Govardhan Asrani Funeral

या प्रश्नाचं उत्तरही मॅनेजर बाबूभाई यांनी दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, असरानी यांच्या पत्नी मंजू यांचा स्पष्ट आग्रह होता की, त्यांच्या पतीच्या निधनाची बातमी कोणालाही दिली जाऊ नये. कारण असरानी यांनी स्वतः पत्नीसमोर आपली अंतिम इच्छा व्यक्त केली होती—”माझे अंत्यसंस्कार शांततेत, कोणताही गोंधळ न करता व्हावेत. पत्नी मंजू यांनीही यासंदर्भात सांगितलं, “असरानी यांना आपल्या जाण्यामुळे कोणाचाही सण बिघडू नये, हे महत्वाचं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी शांततेत निरोप घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही ती पूर्ण केली. Govardhan Asrani Funeral

कोण आहेत मंजू असरानी?

मंजू बंसल, म्हणजेच असरानी यांच्या पत्नी, या देखील 70 च्या दशकातील एक अभिनेत्री होत्या. पंजाबमध्ये जन्मलेल्या मंजू यांनी पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि नंतर विवाह केला. ‘चंदी सोना’, ‘तपस्या’, ‘सरकारी मेहमान’, ‘नालायक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी जोडीदार म्हणून भूमिका केल्या.

एक युग संपलं…

हिंदी सिनेमाच्या विनोदी वाटचालीत असरानी यांचं योगदान मोलाचं आहे. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘आँधि’, ‘बावर्ची’, ‘हरमालिन’सारख्या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्या निधनाने एक संपूर्ण पिढी भावूक झाली आहे. आज, जेव्हा विनोद कमी आणि तणाव अधिक आहे, तेव्हा असरानीसारख्या कलाकाराची उणीव अधिक जाणवेल. त्यांच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.

ताज्या बातम्या