सध्याच्या वेगवान डेटिंग अॅप्स, इन्स्टंट चॅट्स आणि तात्पुरत्या नात्यांच्या या काळात खरा, पारंपरिक रोमॅन्स आता संपलाय असं अनेकांना वाटतं. पण आश्चर्य म्हणजे डिजिटल युगातली नवीन पिढी म्हणजेच Gen Z पुन्हा एकदा शाहरुख खानच्या क्लासिक प्रेमकथांमध्ये गुंतली आहे आणि त्या काळातील त्या भावना पुन्हा अनुभवत आहे. आज शाहरुख खानचा 60 वा वाढदिवस (Happy Birthday Shahrukh Khan) असून त्याची क्रेझ अजूनही कायम असल्याचे हे चित्र आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ), ‘कुछ कुछ होता है’, ‘वीर-जारा’ आणि ‘मोहब्बतें’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेमाचा नवा अर्थ शोधणारे आजचे तरुण या चित्रपटांना OTT प्लॅटफॉर्म्सवर पाहत आहेत किंवा ते थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यास तिकीट घेऊन बघण्यासाठी उत्सुक आहेत.

जुन्या रोमॅन्समध्ये नवीन पिढीची रुची
१८ ते २५ वयोगटातील तरुण पिढी जी शॉर्टफॉर्म कंटेंट आणि सुपरहिरो चित्रपटांमध्ये वाढली आहे, त्यांना शाहरुखच्या प्रेमकथांमधील प्रामाणिकपणा, साधेपणा आणि भावनिक नातं आकर्षित करतं. सरसोंच्या शेतातली भेट, रेल्वे स्टेशनवरील निरोप आणि मोठे प्रेमप्रस्ताव या सगळ्या गोष्टी आजच्या डिजिटल जगात ताजेपणाचा श्वास आणते. चित्रपट विपणन तज्ज्ञ गिरीश वानखेडे यांच्या मते, शाहरुख आणि Gen Z यांचं नातं केवळ नॉस्टॅल्जियाचं नाही, तर त्याच्या सततच्या प्रगतीचं फळ आहे. त्यांनी नेहमीच काळानुसार स्वतःला बदललं सोशल मीडियावर सक्रिय राहणं, OTT स्वीकारणं आणि आधुनिक ब्रँडिंग हे त्यांचं बलस्थान बनलं.
चित्रपट विश्लेषक गिरीश जौहर यांच्या म्हणण्यानुसार, शाहरुख खान हे खऱ्या अर्थाने जागतिक तारा आहेत. त्यांची लोकप्रियता भाषा, संस्कृती आणि वयाच्या सीमा ओलांडते. DDLJ आजही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणते, कारण त्या चित्रपटातला भावनिक गाभा अजूनही ताजा आहे.
सोशल मीडियावर पुन्हा जुने क्लासिक्स Happy Birthday Shahrukh Khan
‘कुछ कुछ होता है’, ‘मोहब्बतें’ आणि ‘कल हो ना हो’मधील दृश्ये आजही इंस्टाग्राम रील्स आणि टिकटॉकवर ट्रेंडिंग आहेत. Gen Z ही दृश्ये कधी विनोदी, कधी भावनिक अशा कॅप्शनसह शेअर करत असली तरी त्यांच्या अंतर्भूत भावना कायम आहेत. राज आणि राहुल हे पात्र आजच्या तरुणांनाही रिलेट होतात.
चित्रपटांचे पुन्हा प्रदर्शन
यशराज फिल्म्ससारख्या प्रॉडक्शन हाउसेस या क्लासिक चित्रपटांना पुन्हा निवडक थिएटरमध्ये रिलीज करत आहेत. ‘डिलाइट सिनेमा’चे व्यवस्थापक राजकुमार मल्होत्रा सांगतात, “लोक हे चित्रपट पुन्हा पाहू इच्छितात कारण यात खरं प्रेम, सुंदर संगीत आणि अस्सल भावना आहेत.” प्रत्येक शो एक सणासारखा असतो लोक ९० च्या दशकातील कपड्यांमध्ये सजतात, तुझे देखा तो ये जाना सनम’ गातात आणि थिएटर आठवणींच्या उत्सवात परिवर्तित होतं. Happy Birthday Shahrukh Khan
3 दशकांनंतरही ‘किंग ऑफ रोमॅन्स’
‘पठाण’ आणि ‘जवान’सारख्या ब्लॉकबस्टर्सने शाहरुखने स्वतःला पुन्हा नव्याने परिभाषित केलं आहे. रोमॅन्सच्या बादशाहपासून अॅक्शन स्टारपर्यंतचा प्रवास करतानाही त्यांनी भावनिक गाभा कायम ठेवला. गिरीश जौहर म्हणतात, “शाहरुख फक्त नॉस्टॅल्जियावर नाही टिकला. त्याने प्रत्येक पिढीशी जोडलेपण राखलं, आणि हीच त्याची खरी ताकद आहे.”
Gen Z साठी शाहरुखचे चित्रपट हे केवळ सिनेमा नाहीत ते एक अनुभव आहेत. आज जेव्हा नाती ‘स्वाइप’ आणि ‘अल्गोरिद्म’पुरती मर्यादित झाली आहेत, तेव्हा शाहरुखच्या प्रेमकथांतील माणुसकी आणि सच्चेपणा अधिक जिवंत वाटतो. शेवटी, जेव्हा पर्यंत कोणी, कुठे, कोणावर तरी प्रेम करत राहील तोपर्यंत शाहरुख खानचं जादू कायम राहील.











