Haq Box Office Collection : यामी गौतम आणि इमरान हाश्मीच्या ‘हक’ ने पकडली गती; दुसऱ्या दिवशी दुप्पट कमाई

Asavari Khedekar Burumbadkar

इमरान हाश्मी आणि यामी गौतम अभिनीत ‘हक’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद (Haq Box Office Collection) मिळत आहे. हा चित्रपट शाह बानो बेगमयांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या ऐतिहासिक कायदेशीर लढाईवर आधारित आहे. 1985 साली शाह बानो प्रकरणामुळे सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित मुस्लिम महिलांना भरण-पोषणाचा अधिकार दिला होता, आणि याच सामाजिक विषयावर ‘हक’ची कथा उभी राहते.

दुसऱ्या दिवशी दुपटीने वाढला कलेक्शन (Haq Box Office Collection)

Sacnilk च्या प्राथमिक अहवालानुसार, ‘हक’ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 3.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच्या 1.75 कोटींच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाने एकूण 5.10 कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर जमा केले आहेत. या वाढीमुळे चित्रपटाला चांगले तोंडी प्रमोशन मिळत असून, आठवड्याच्या शेवटी कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद

सिनेमागृहात ‘हक’ पाहिलेल्या अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. बहुतेकांनी या चित्रपटाला “भावनिक, ताकदीचा आणि विचार करायला लावणारा” असे म्हटले आहे. यामी गौतमने स्वतः तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया शेअर करत आभार मानले. तिने एका पोस्टमध्ये लिहिले, “मी त्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत केली आहे जिथे मला सर्जनशील समाधान आणि प्रेक्षकांचा प्रेम दोन्ही मिळतंय. म्हणून मी मनापासून फक्त दोन शब्द म्हणू इच्छिते, धन्यवाद..(Haq Box Office Collection)

सामाजिक संदेशासोबत ताकदीचा अभिनय

‘हक’ हा एक लीगल ड्रामा असून तो मुस्लिम महिलांच्या अधिकारांवरील संघर्षाला अधोरेखित करतो. चित्रपटात यामी गौतम धरने शाझिया नावाच्या गृहिणीची भूमिका साकारली आहे, जी अशिक्षित असली तरी आपल्या अधिकारांसाठी न्यायालयापर्यंत लढा देते. इमरान हाश्मीने तिच्या नवऱ्याची अब्बास खान या वकिलाची  भूमिका निभावली आहे. कथेत असा दाखवले आहे की, एक दिवस अब्बास दुसरी पत्नी घरात आणतो आणि नंतर तीन तलाक देऊन शाझियाला सोडून देतो. त्यानंतर शाझियाची सुरू होणारी कायदेशीर लढाईच या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.

दमदार स्टारकास्ट आणि दिग्दर्शन

‘हक’चे दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा यांनी केले असून चित्रपटात वर्तिका सिंह, दानिश हुसेन, शीबा चड्ढा आणि असीम हट्टंगडी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यामी आणि इमरान यांच्या परफॉर्मन्सचे विशेष कौतुक होत आहे. ‘हक’ने दुसऱ्या दिवशी केलेल्या दुप्पट कमाईमुळे हा चित्रपट हळूहळू गती पकडत आहे. सामाजिक विषय, दमदार अभिनय आणि प्रभावी कथाकथन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. आठवड्याच्या शेवटी ‘हक’ आणखी मोठी झेप घेईल अशी अपेक्षा बॉक्स ऑफिस विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या