धर्मेंद्रच्या निधनाच्या दिवशी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज; वडिलांच्या भूमिकेत दिसले ‘ही-मॅन’

Asavari Khedekar Burumbadkar

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या दिवशी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र एका गौरवशाली वडिलांच्या भूमिकेत दिसतात. बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबियांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड दुःख पसरले आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक चित्रपटांत अभिनय करत आपल्या अढळ प्रतिभेची छाप पाडली. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा एक चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे, ज्याचे नाव आहे ‘इक्कीस’.

काय आहे ट्रेलरमध्ये –

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ या चित्रपटाचा नवा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये धर्मेंद्र यांनी 21 वर्षीय सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचे वडिलांचे पात्र साकारले आहे. अरुण खेत्रपाल, ज्यांची भूमिका अमिताभ बच्चन यांच्या नातू अगस्त्य नंदा यांनी साकारली आहे, हे भारताचे सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते आहेत. बसंतरच्या युद्धादरम्यान आपला टँक नुकसान झाल्यानंतरही त्यांनी पाकिस्तानी टँक दलाचा सामना केला आणि अविस्मरणीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च वीरता पुरस्कार प्रदान करण्यात आला. ट्रेलरमध्ये अगस्त्य नंदा अत्यंत आव्हानात्मक भूमिकेसाठी पूर्णतः तयारीत दिसतात. नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ‘इक्कीस’ ही त्यांची पहिली थिएटर रिलीज फिल्म आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अक्षय कुमार यांची भाची सिमर भाटिया तसेच प्रतिभावान अभिनेता जयदीप अहलावत देखील झळकत आहेत.

21 वर्षीय अमर सैनिकाच्या वडिलांच्या भूमिकेत धर्मेंद्र-

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी धर्मेंद्र यांचे एक पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरवर लिहिलेल्या ओळी विशेष चर्चेत आल्या होत्या. त्यात नमूद केले होते की, “वडील मुलांचे पालनपोषण करतात, तर महापुरुष राष्ट्र घडवतात. 21 वर्षीय अमर सैनिकाच्या वडिलांच्या भूमिकेत धर्मेंद्र एक भावनिक शक्तीचा स्रोत आहेत. एक कालातीत दिग्गज आणखी एका दिग्गजाची कथा सांगत आहे.” तसेच पोस्टरमध्ये हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याची माहितीही देण्यात आली होती. नवीन ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, “एका वडिलांचे सर्वात भयंकर स्वप्न हे एका देशासाठी पुन्हा स्वप्न पाहण्याचे कारण बनले. तो ज्याने फक्त हिंदुस्तानच नव्हे, तर पाकिस्तानी सैन्यासाठीही एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.” धर्मेंद्र यांच्या भावनिक अभिनयामुळे आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या भूमिकेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणखी खास ठरणार आहे.

ताज्या बातम्या