Jay Mahi Divorce : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी जय – माहीचा घटस्फोट

गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि अखेरीस या नात्याचा शेवट झाला.

टीव्ही जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोटे पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि आवडते दांपत्य म्हणून ओळखले जाणारे जय भानुशाली आणि माही विज आता एकमेकांपासून (Jay Mahi Divorce( वेगळे झाले आहेत. चौदा वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट करत या दोघांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला आहे.

काही वर्षांपासून नात्यात तणाव – (Jay Mahi Divorce)

जय आणि माही हे दोघेही टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरे आहेत. जय भानुशालीने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये होस्ट म्हणून काम केलं आहे, तर माही विजने ‘लागी तुझसे लगन’, ‘लाल इश्क’ आणि ‘बालिका वधू’ यांसारख्या मालिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दोघांनी २०११ साली लग्न केलं होतं. जय त्या वेळी २६ वर्षांचा होता, तर माही त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी म्हणजे २९ वर्षांची होती. वयातील हा फरक कधीच त्यांच्या नात्याच्या आड आला नाही, उलट ते दोघं टीव्हीच्या ‘आदर्श कपल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि अखेरीस या नात्याचा शेवट झाला.

गेल्या काही महिन्यांपासून जय आणि माही यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू होत्या. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. काही माध्यमांनी त्यांच्या वादांबद्दलही वृत्त दिलं होतं. दोघांनीही आपला संसार वाचवण्यासाठी प्रयत्न केले, एकत्र थेरपी घेतली, समुपदेशन सत्रांनाही हजेरी लावली, पण परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. शेवटी त्यांनी आपसी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वीच दोघांनी न्यायालयात घटस्फोटाची अर्ज दाखल केली होती. त्यानंतर काही काळ ते वेगवेगळं राहात होते आणि आता त्यांच्या विभक्त होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

जय माही ला 3 मुले

या वर्षी जुलै महिन्यातच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी दोघांनी कोर्टात हजर राहून आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्याची बातमीही समोर आली होती. काही महिन्यांच्या आतच दोघांनी परस्पर सहमतीने आपलं वैवाहिक नातं संपवलं आहे. जय आणि माही हे केवळ पती-पत्नीच नव्हते, तर ते तीन मुलांचे आई-वडीलही आहेत. २०१७ साली त्यांनी आपल्या घरातील कामगारांच्या दोन मुलांना  राजवीर आणि खुशी  दत्तक घेतलं. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांची जैविक मुलगी तारा आली. या तीनही मुलांवर दोघांनाही अपार प्रेम आहे. घटस्फोटानंतरही ते मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र पार पाडतील, असं सूत्रांकडून समजतं. सध्या मुलांच्या कायदेशीर कस्टडीबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, पण दोघेही मुलांच्या संगोपनात सक्रिय सहभाग घेतील, अशी अपेक्षा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

या डिव्होर्स नंतर जय आणि माही दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. जय सध्या काही रिअॅलिटी शोज आणि मालिकांशी जोडलेला आहे, तर माही काही डिजिटल प्रोजेक्ट्ससाठी तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे. दोघांनीही एकमेकांबद्दल कोणतीही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. उलट त्यांनी शांततेत हा निर्णय घेण्याचं ठरवलं, जेणेकरून त्यांच्या मुलांवर याचा विपरित परिणाम होऊ नये.

त्यांचं नातं संपलं असलं, तरी त्यांनी दाखवलेली परिपक्वता आणि एकमेकांबद्दलचा आदर अनेकांसाठी उदाहरण ठरू शकतो. जय आणि माही यांच्या या निर्णयाने पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की, नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं  परस्पर समजूत आणि सुसंवादही तेवढाच महत्त्वाचा असतो. टीव्ही विश्वातील या प्रसिद्ध जोडप्याच्या ताटातूटीनं त्यांच्या चाहत्यांना वेदना दिल्या असल्या, तरी दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात सकारात्मकतेने करण्याचा निर्धार केल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून समजतं.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News