जुबेन यांचा अपघात नाही, हत्या? आसाम विधानसभेत मुख्यमंत्री सरमा यांचा धक्कादायक खुलासा

Asavari Khedekar Burumbadkar

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलघडण्याची शक्यता आहे. लोकप्रिय गायकाच्या अचानक मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. 19 सप्टेंबर 2025 रोजी सिंगापूरमधील एका यॉट पार्टीदरम्यान समुद्रात गेलेल्या जुबिनचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही घटना अपघाती बुडण्याची असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही महिन्यांच्या तपासानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले असून आता ते हत्या प्रकरणात परिवर्तित झाले आहे. हा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचं एका मोठ्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा??

24 नोव्हेंबर रोजी असम विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणाशी संबंधित धक्कादायक खुलासा केला. त्यांनी विधानसभेत सांगितले की, तपासात स्पष्ट झाले आहे की जुबिन गर्ग यांना जाणूनबुजून इजा पोहोचवण्यात आली आणि त्यांचा मृत्यू अपघात नव्हता. मुख्यमंत्री यांच्या या विधानाने संपूर्ण सदनात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. अनेक महिन्यांपासून न्यायाची मागणी करणाऱ्या चाहत्यांसाठी हा खुलासा काहीसा दिलासा देणारा ठरला आहे. जुबिनच्या निधनानंतर असममध्ये अभूतपूर्व प्रतिक्रिया उमटली होती; बाजारपेठा दिवसोनदिवस बंद राहिल्या, शाळा आणि महाविद्यालयेही ठप्प झाली होती.

जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या तपासासाठी असम पोलिसांच्या CID विभागाने नऊ सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर गुवाहाटी हायकोर्टाचे न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाने संबंधित व्यक्तींना आणि संस्थांना आपली निवेदने आणि पुरावे सादर करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत 12 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. कोणीही व्यक्ती किंवा संस्था नोटराइज्ड हलफनामा आणि उपलब्ध पुराव्यांसह आयोगाकडे माहिती देऊ शकते.

सिंगापूर पोलीसही करतायत तपास

दरम्यान, सिंगापूर पोलिसही स्वतंत्र तपास करत आहेत. त्यांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालाची प्रत भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला देण्यात आली आहे. या अहवालात मृत्यूचे कारण बुडणे असे नमूद केले असले, तरीही संशयास्पद परिस्थिती नाकारण्यात आलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तपास अधिक गतीमान होण्याची शक्यता आहे.

जुबिन गर्ग यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूनंतर सर्वप्रथम तक्रार नोंदवली होती. त्यांची पत्नी गारिमा सैकिया गर्ग, भाभी पामि बर्थाकुर आणि चाचा मनोत बोरठाकुर यांनी असम CID कडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. कुटुंबीय आणि चाहत्यांची एकच मागणी आहे. जुबिनच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी.

या धक्कादायक खुलास्यानंतर आता तपास आणखी वेग घेण्याची शक्यता आहे. असम सरकार, सिंगापूर पोलिस आणि न्यायिक आयोग यांच्या संयुक्त तपासातून पुढील काही दिवसांत महत्त्वाचे पुरावे समोर येऊ शकतात. देशभरातील संगीतप्रेमी आणि जुबिन गर्ग यांचे चाहते या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे लक्ष ठेवून आहेत.

ताज्या बातम्या