मुंबईच्या नावासंदर्भात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. या वेळी केंद्रस्थानी आहे देशातील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’. या शोमध्ये आजही “बॉम्बे” असा शब्दप्रयोग होतो, ( Kapil Sharma Bombay Controversy)आणि हेच मनसेला खटकले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट शाखेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी याविरोधात थेट सोशल मीडियावर आवाज उठवला आहे. त्यांनी शोमधील एका विशिष्ट भागातील क्लिप शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि स्पष्ट शब्दांत “मुंबई”चा योग्य वापर करण्याची सूचना केली आहे.
नेमकं काय घडलं? ( Kapil Sharma Bombay Controversy)
काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी, तिचा भाऊ साकिब सलीम, आणि शेट्टी भगिनी – शिल्पा आणि शमिता पाहुण्या म्हणून सहभागी झाले होते. या एपिसोडमध्ये हुमा कुरेशीने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना, “जेव्हा मी बॉम्बे आली…” असा उल्लेख केला. हा भाग पाहून खोपकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांच्या मते, 1995 मध्ये मुंबईचं नाव अधिकृतपणे “बॉम्बे” वरून “मुंबई” करण्यात आलं असून, केंद्र सरकारनेही 1996 मध्ये याला मान्यता दिली आहे. तरीही, अनेक चित्रपट, मालिका आणि आता टीव्ही शोमध्ये जुनं नाव वापरलं जातं, हे महाराष्ट्राच्या अस्मितेला न जुमानणं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. (Kapil Sharma Bombay Controversy)

अमेय खोपकर यांचं विधान
“मुंबईचं नाव बदलून ३० वर्ष झालीत, तरी आजही हिंदी चित्रपट, कार्यक्रम आणि शोमध्ये ‘बॉम्बे’ हा उल्लेख सर्रास केला जातो. ‘द कपिल शर्मा शो’मधील हा प्रकार खेदजनक आहे. सेलिब्रिटी, अँकर, खासदार असो, सर्वांनी मुंबईचा सन्मान ठेवावा. हे एक विनंतीवजा इशारा आहे. अस अमेय खोपकर यांनी म्हटलं.
कपिल शर्मा शोची भूमिका काय?
मनसेच्या या इशाऱ्यामुळे शो आणि त्याच्या टीमवर दबाव वाढला आहे. अद्यापपर्यंत कपिल शर्मा किंवा त्यांच्या टीमने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण मनसेच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत, तर काही याला विनोदावर बंदी घालण्याचा प्रयत्न मानत आहेत.
निवडणूक वारं आणि राजकीय गणित?
या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विश्लेषकांचा अंदाज आहे की, मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना, मुंबईच्या अस्मितेशी संबंधित मुद्दे पुन्हा ऐरणीवर आणले जात आहेत. त्यामुळे मनसेने उचललेला हा विषय केवळ भाषेचा मुद्दा नसून, त्यामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या प्रकरणावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेटकर्यांनी “मुंबई हे भावनिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे, त्याचा आदर झाला पाहिजे,” असं म्हणत मनसेच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तर काही जण म्हणत आहेत की, “भाषेच्या लहानशा मुद्द्यावरून इतकं लक्ष देण्यापेक्षा खऱ्या समस्यांवर चर्चा व्हावी.”
मुंबईचं नाव “बॉम्बे” न म्हणता “मुंबई” म्हणणं हे फक्त नावापुरतं नसून, मराठी अस्मिता आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचं प्रतीक आहे, असं मनसेचं स्पष्ट मत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ यावर काय प्रतिक्रिया देतो, आणि यापुढे अशा मुद्द्यांवर मनोरंजनविश्व कशी भूमिका घेते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे











