२ नोव्हेंबर हा दिवस जगभरात शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक सणासारखा असतो. प्रत्येक वर्षी हा दिवस ‘SRK डे’ म्हणून साजरा केला जातो. पण यंदा हा दिवस अधिक खास ठरला, कारण याच दिवशी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुखच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपट ‘किंग’चा (King First Look) टायटल रिव्हील व्हिडिओ प्रदर्शित केला. शाहरुखने हा खास व्हिडिओ आपल्या वाढदिवशी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना भन्नाट सरप्राईज दिलं. काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि जगभरातील चाहत्यांनी ‘किंग’च्या फर्स्ट लूकवर भरभरून प्रेम व्यक्त केलं.
‘किंग’ हा शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद या सुपरहिट जोडीचा दुसरा सहयोग आहे. याआधी दोघांनी मिळून ‘पठाण’सारखा ब्लॉकबस्टर दिला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. आता ‘किंग’ या नव्या चित्रपटातून हे दोघे पुन्हा एकदा एक्शन सिनेमाच्या जगात क्रांती घडवण्यास सज्ज आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स या दोन मोठ्या बॅनरखाली तयार होणारा हा मेगा अॅक्शन थ्रिलर चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

काय आहे व्हिडिओ मध्ये (King First Look)
टायटल रिव्हील व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा नवा आणि जबरदस्त अवतार पाहायला मिळतो. त्यांचा संवाद “सौ देशों में बदनाम, दुनिया ने दिया सिर्फ एक ही नाम… किंग” हा ऐकताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. व्हिडिओमध्ये शाहरुख हातात ‘किंग ऑफ हार्ट्स’चं कार्ड धरून दिसतात आणि तो कार्ड जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतीक वाटतं. शाहरुख रिअल लाईफमध्ये ‘दिलों के बादशाह’ म्हणून ओळखले जातात आणि या दृश्यात त्याच टॅगलाईनचा अप्रत्यक्ष संदर्भ जाणवतो.
कसा आहे शाहरुखचा लुक
शाहरुखचा या चित्रपटातील लूक पूर्णपणे वेगळा आणि आकर्षक आहे. त्यांच्या सिल्व्हर रंगाच्या केसांनी, कानातील स्टायलिश इयररिंगने आणि आत्मविश्वासपूर्ण नजरेने त्यांच्या व्यक्तिरेखेला अधिक धार दिली आहे. चाहत्यांच्या मते, हा लूक त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात धाडसी आणि आधुनिक लूकपैकी एक आहे.
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘किंग’ला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि भव्य प्रकल्प म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की हा चित्रपट अॅक्शन स्टोरीटेलिंगला एका नव्या उंचीवर नेणार आहे. त्यांनी म्हटलं, “किंग हा फक्त एक अॅक्शन चित्रपट नाही, तर शाहरुख खानच्या ओळखीचा, त्यांच्या सिनेमॅटिक प्रवासाचा आणि त्यांच्या आयकॉनिक व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे.”
शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी ‘किंग’चा टायटल रिव्हील हा केवळ एका चित्रपटाचा ट्रेलर नसून एक भावनिक क्षण ठरला आहे. ‘पठाण’नंतर शाहरुख आणि सिद्धार्थ यांच्या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांना भव्य अनुभव देण्याचं आश्वासन दिलं आहे. २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘किंग’कडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. कारण या वेळी शाहरुख खान फक्त ‘किंग ऑफ रोमॅन्स’ नाहीत, तर एका अशा व्यक्तिरेखेत दिसणार आहेत जी फक्त डर नाही, तर दहशत निर्माण करते. हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर नव्हे, तर चाहत्यांच्या हृदयातही नवा अध्याय लिहिणार यात शंका नाही.











