Malaika Arora : बॉलिवूडची सुपरहिट डीव्हा मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अर्जुन कपूरसोबत तिचं नातं तुटल्यानंतर काही महिन्यांतच तिच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आल्याच्या चर्चा वेगाने पसरत आहेत. ही नवी एंट्री म्हणजे 33 वर्षांचा तरुण डायमंड उद्योजक हर्ष मेहता. दोघे अनेक वेळा एकत्र दिसल्याने त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा आता इंडस्ट्रीतून थेट सोशल मीडियावर पोहोचली आहे.
कॉन्सर्टमध्ये पहिली झलक (Malaika Arora)
29 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टमध्ये मलायका आणि हर्ष प्रथमच एकत्र पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांशी आरामात बोलताना दिसले होते. शो संपल्यानंतर दोघे एकाच मार्गाने बाहेर पडले आणि याच क्षणापासून त्यांच्या नात्याबद्दलच्या कुजबुजींना सुरुवात झाली. चाहत्यांनी आणि पापाराझींनी लगेचच या संभाव्य रिलेशनची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल केली.

एअरपोर्टवर पुन्हा एकत्र
या चर्चांना अजून हवा मिळाली जेव्हा 26 नोव्हेंबरला मलायका आणि हर्ष पुन्हा एकदा एकाच ठिकाणी दिसले. यावेळी एअरपोर्टवर दिसलेल्या दोघांनी एकत्र चालणं मात्र टाळलं. मलायका (Malaika Arora) काही अंतर पुढे होती, तर हर्ष थोड्या अंतरावर मागे चालताना दिसला. हर्षने साधे कपडे आणि चेहरा झाकण्यासाठी मास्क घातला होता, त्यामुळे तो ओळखू नये अशी त्याची इच्छा स्पष्ट दिसत होती. तरीही पार्किंग एरियात दोघे एकाच कारमध्ये बसताना दिसले. मलायका आधी कारमध्ये बसली, आणि काही वेळाने हर्षही त्याच वाहनात जाऊन बसल्याचे कॅमेऱ्यांनी कैद केले. या दृश्यामुळे त्यांच्या नात्याच्या अफवा आणखी बळावल्या. तरीही मलायकाने या संपूर्ण प्रकरणावर अजूनही कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.
अर्जुन कपूरसोबतच्या नात्याचा शेवट
मलायका आणि अर्जुन कपूर यांनी 2018 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले होते. बॉलिवूडमधील हा एक चर्चेतला कपल होता. मात्र 2024 मध्ये दोघांमध्ये मतभेद वाढू लागले आणि अखेर त्यांचे नाते संपले. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने मीडियासमोर स्पष्टपणे सांगितले होते की आता तो सिंगल आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या ब्रेकअपची सर्वत्र पुष्टी झाली.
वर्क फ्रंटवरही मलायका तितकीच सक्रिय
वैयक्तिक आयुष्यात कितीही चढउतार आले तरी मलायका तिच्या व्यावसायिक आयुष्यात सतत सक्रिय आहे. अलीकडेच ती थामाच्या ‘Poison Baby’ या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली. तिची परफॉर्मन्स आणि ग्लॅमरस अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला. तसेच ती करण जोहरसोबत ‘Pitch To Get Rich’ या रिअॅलिटी शोचा भाग आहे. याशिवाय ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या नव्या सीझनमध्ये ती नवजोत सिंह सिद्धू आणि गायक शानसोबत जज म्हणून दिसत आहे.
मलायका आणि हर्ष मेहता यांच्यातलं नातं नेमकं काय आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. दोघे फक्त मित्र आहेत की खरोखरच काहीतरी खास सुरु आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मलायकाकडून अधिकृत वक्तव्य येईपर्यंत या चर्चांचा सिलसिला थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.