बॉलीवूडमधील लोकप्रिय एडल्ट कॉमेडी सिरीज ‘मस्ती’चा चौथा भाग ‘Masti 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख कलाकार विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदसानी आणि अभिनेत्री एलनाझ नरौजी उपस्थित होते. मात्र या इव्हेंटदरम्यान घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे.
स्टेजवर ‘मस्ती 4’ टीमसोबत उभी असताना एलनाझ नरौजीची स्कर्ट अचानक सैल होऊन खाली सरकली. हा प्रसंग पाहून थोडा गोंधळ निर्माण झाला, पण त्याच वेळी विवेक ओबेरॉय यांनी दाखवलेली संवेदनशील प्रतिक्रिया सर्वांच्या नजरा खेचून घेतली. विवेक यांनी सुरुवातीला मदतीसाठी हात पुढे केला, पण लगेचच समजले की एलनाझ स्वतः ही परिस्थिती हाताळू शकते. त्यामुळे त्यांनी लगेच चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला, जेणेकरून अभिनेत्रीला कुठलीही लाज किंवा अस्वस्थता वाटू नये. त्यांच्या या जेंटलमॅन स्वभावाने सगळ्यांची मने जिंकली.

सच्चा जेन्टलमॅन
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटिझन्स विवेक ओबेरॉयच्या या वागणुकीचं कौतुक करत आहेत. अनेकांनी त्यांना ‘सच्चा जेंटलमॅन’ म्हटले आहे. काहींनी म्हटले की आजच्या काळात असा आदरयुक्त आणि संयमी दृष्टिकोन फारच क्वचित पाहायला मिळतो. काही युजर्स विवेकची तुलना जुन्या काळातील संस्कारी आणि सभ्य अभिनेत्यांशी करत आहेत.
ट्रेलर 3 मिनिटांचा Masti 4
या व्हायरल घटनेसोबतच ‘Masti 4’ चा ट्रेलरही चर्चेत आला आहे. साधारण तीन मिनिटांचा हा ट्रेलर नेहमीप्रमाणेच एडल्ट कॉमेडी, मजेदार संवाद आणि हटके प्रसंगांनी भरलेला आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदसानी पुन्हा एकदा त्यांच्या खास मस्तीफुल अंदाजात दिसत आहेत.
ट्रेलरनुसार या वेळेस चित्रपटाचा विषय ‘लव्ह व्हिसा’ या संकल्पनेभोवती फिरतो. ‘मस्ती’ सिरीजची ओळख असलेल्या विनोदी आणि नटखट शैलीत हा भागही तयार करण्यात आला आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा भरपूर हास्य, गोंधळ आणि धमाल अनुभवायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर विवेक ओबेरॉयच्या सज्जनतेचा व्हिडिओ आणि ‘मस्ती 4’ चा ट्रेलर या दोन्ही गोष्टींनी जोरदार चर्चा रंगवली आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.