९ वर्षांनंतर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या शेवटच्या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येणार आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मॉम’ या चित्रपटाने आपल्या दमदार कथानक आणि श्रीदेवींच्या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता त्याच चित्रपटाचा सिक्वेल ‘मॉम २’ लवकरच (Mom 2 Movie)सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटावर अधिकृतरित्या काम सुरू झाले असून, सोशल मीडियावर या सिक्वेलबद्दल अनेक बातम्या व्हायरल होत आहेत.
श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर मुख्य भूमिकेत- Mom 2 Movie
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मॉम २’ मध्ये श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रीदेवींच्या वारशाला पुढे नेणारी ही भूमिका खुशीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना हिला देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले गेले आहे. खुशी कपूर आणि करिश्मा तन्ना या दोघींची एकत्र जोडी पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव ठरणार आहे. दोघींच्या भिन्न अभिनयशैलीमुळे चित्रपटात काहीतरी खास आणि अनोखे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चित्रपट महिलांच्या आयुष्याभोवती फिरणारा-
पिंकविलाच्या अहवालानुसार, ‘मॉम २’ हा (Mom 2 Movie) मूळ चित्रपटाशी थेट जोडलेला नसेल. म्हणजेच हा सिक्वेल एक वेगळी, नवीन कथा मांडणार आहे. या वेळेस चित्रपट पूर्णपणे महिलांच्या आयुष्याभोवती फिरणारा असेल आणि त्यांच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित कथा मांडेल. चित्रपटात उच्चस्तरीय नाट्य आणि सस्पेन्स असेल, तसेच त्यात आधुनिक समाजातील वास्तवाचेही प्रतिबिंब दिसेल. ‘मॉम २’ ची कथा प्रेक्षकांना भावनिक पातळीवर भिडेल, पण त्याचवेळी आधुनिक ट्विस्टमुळे ती तरुण पिढीलाही आकर्षित करेल, असे सांगितले जात आहे.
गिरीश कोहली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी मूळ ‘मॉम’ चित्रपटाची सहलेखन जबाबदारीही सांभाळली होती. त्यामुळे त्यांना मूळ चित्रपटाच्या भावनिक बाजूची उत्तम जाण आहे. श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ चे निर्माते बोनी कपूर होते, मात्र या वेळेस निर्मितीची जबाबदारी गिरीश कोहली स्वतः उचलत आहेत.सध्या ‘मॉम २’ चे शूटिंग सुरू झाले आहे आणि लवकरच चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप चित्रपटाच्या रिलीज डेटविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. श्रीदेवी यांच्या शेवटच्या चित्रपटाचा हा सिक्वेल त्यांच्या चाहत्यांसाठी भावनिक ठरणार आहे. खुशी कपूरच्या माध्यमातून तिच्या आईचा वारसा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जिवंत होईल का, हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे.











